
Rohit pawar : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर ₹५,००० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप करत सिडकोच्या भूमी वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “मराठा साम्राज्याविरुद्ध काम करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला नवी मुंबईतील १५ एकर जमीन देणे म्हणजे भूमिपुत्रांशी गद्दारी,” असा थेट आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला
या प्रकरणाची मुळे ब्रिटिश काळात आहेत. बिवलकर कुटुंबाला ब्रिटिशांनी मराठा साम्राज्याविरोधात मदत केल्याबद्दल इनाम म्हणून ४,००० एकर जमीन दिली होती. स्वातंत्र्यानंतर विविध कायद्यांमुळे ही जमीन सरकारकडे जमा झाली होती. मात्र, २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने बिवलकर कुटुंबाच्या बाजूने निकाल दिला. रोहित पवार यांच्या मते, सिडकोच्या वकिलांनी सिलिंग कायद्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडला नाही, त्यामुळे न्यायालयाचा निर्णय एकतर्फी झाला.
रोहित पवार यांनी आरोप केला की, संजय शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्ष असताना पहिल्याच बैठकीत नियम धाब्यावर बसवून बिवलकर कुटुंबाला नवी मुंबईतील १५ एकर जमीन दिली. या जमिनीची सध्याची बाजार किंमत ₹५,००० कोटींहून अधिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. “ही जमीन गरीबांसाठी राखीव होती. त्यावर १०,००० घरे बांधता आली असती,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणावरून रोहित पवार यांनी सरकारकडे शिरसाटांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी ३६१ कागदपत्रे ट्विटरवर शेअर करून या घोटाळ्याचे पुरावे सादर केले आहेत. “भूमिपुत्र जमिनीच्या हक्कासाठी संघर्ष करत आहेत, आणि दुसरीकडे गद्दार कुटुंबाला जमीन दिली जाते,” असा भावनिक मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
संजय शिरसाट यांच्याकडून या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, त्यांच्या विरोधातील वादग्रस्त घटनांची मालिका यापूर्वीही चर्चेत राहिली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, सिडकोच्या भूमी वाटप प्रक्रियेवर पारदर्शकतेची मागणी जोर धरू लागली आहे.