Weather update : राज्यात हवामान स्थिरतेकडे; ८ ऑक्टोबरपासून मान्सूनला निरोप देण्याची शक्यता..

Weather update : राज्यात सलग चार महिने समाधानकारक पावसाची नोंद झाल्यानंतर आता हवामान स्थिर होण्यास सुरुवात झाली आहे. यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस दिला असून, राज्यात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ८ ऑक्टोबर २०२५ पासून मान्सून राज्यातून हळूहळू निरोप घेण्यास सुरुवात करेल.

राज्यातील बहुतांश भागांमध्ये २९ सप्टेंबरपासून हवामान स्थिर राहिले आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा समावेश असणार असून तो दुपारनंतर होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामानातील बदल लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काढणी केलेली पिके पावसापासून आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः विदर्भात वादळी पावसाची शक्यता अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे, असे सूचित करण्यात आले आहे.

यंदा मान्सूनने राज्यात मे महिन्यातच जोरदार आगमन केले होते. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही पावसाचे प्रमाण अधिक राहिले. गतवर्षी २६ टक्के अधिक पाऊस पडला होता, तर यंदाही चारही महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्र, जलसाठे आणि शेतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान विभागाच्या पुढील अंदाजानुसार, ८ ऑक्टोबरपासून मान्सूनचा राज्यातून हळूहळू निरोप सुरू होईल आणि त्यानंतर काही दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परत जाईल. यामुळे हवामान अधिक स्थिर होईल आणि रबी हंगामासाठी तयारी सुरू होईल. शेतकरी, व्यापारी आणि प्रशासनाने या बदलत्या हवामानानुसार आपली रणनीती आखावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे