Insurance application : महाराष्ट्र शासनाने रब्बी हंगाम २०२५-२६ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे, ज्याचा उद्देश शेतकऱ्यांचे आर्थिक संरक्षण करणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून त्यांना सुरक्षित ठेवणे हा आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील सहा प्रमुख पिकांचा समावेश करण्यात आला आहे — गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमुग आणि रब्बी कांदा. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होणे ऐच्छिक ठेवले आहे.
शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी PMFBY पोर्टलवर नोंदणी करता येईल किंवा बँक, विमा कंपनीचे एजंट, सामूहिक सेवा केंद्र (CSC) तसेच क्रॉप इंन्शुरन्स अॅपच्या माध्यमातून अर्ज सादर करता येईल. कर्जदार शेतकऱ्यांना अर्ज त्यांच्या बँकेमार्फत सादर करावा लागेल, तर सहभागी न होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणीच्या अंतिम तारखेच्या सात दिवस आधी बँकेस लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक आहे. अन्यथा, त्यांचा सहभाग स्वयंचलितपणे बंधनकारक धरला जाईल.
अर्ज सादरीकरणाच्या अंतिम मुदती पुढीलप्रमाणे आहेत — रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) साठी ३० नोव्हेंबर २०२५, गहू (बागायत), हरभरा आणि रब्बी कांदा साठी १५ डिसेंबर २०२५, तसेच उन्हाळी भात आणि उन्हाळी भुईमुग साठी ३१ मार्च २०२६. सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पूर्ण करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी, तहसिलदार किंवा संबंधित विमा कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.














