सध्या राज्यात तापमानात वाढ (Rise in temperature) झाली आहे. दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत आहे तर रात्री काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे.
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका तर कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) होत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या राज्यात तापमानात वाढ (Rise in temperature) झाली आहे. दिवसभर उन्हाचा कडाका जाणवत आहे तर रात्री काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मात्र, मोठा फटका बसत आहे. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं जमिनदोस्त होताना दिसत आहेत. यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी कडक उन्हाळा तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
परभणीत दिवसा तापमानाचा पारा 41.02 अंशावर तर रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस
परभणी शहरासह जिल्हाभरात मागच्या चार दिवसांपासून तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढं गेला आहे. काल हे तापमान 41.02 अंशावर गेल्याने दिवसभर कडक ऊन पडले होते. त्यानंतर संध्याकाळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळं दिवसा उन्हाळा आणि रात्री पावसाळा अशा दोन्ही ऋतूंची अनुभूती परभणीकरांना आली. जवळपास एक तासाहून अधिक वेळ परभणीत विजांचा गडगडाटासह वादळी पाऊस झाला. केवळ परभणी शहरच नाही तर जिल्ह्यातील अनेक भागात हा अवकाळी पाऊस पडला. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं फळबागांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
परभणीसह राज्याच्या इतरही भागात उन्हाचा कडाका वाढला आहे. पश्चि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळं तिथे नागरिकांना उन्हाचा त्रास होत आहे. तसेच विदर्भ, मराठवाड्यातही उन्हाचा कडाका कायम आहे. या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
देशातील तापमानातही वाढ
देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठे उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण तर कुठे पाऊस पडत आहे. सध्या देशातील तापमानात (Temperature) कमालीची वाढ झाली आहे. बहुतांश शहारात तापमानाचा पारा हा 40 ते 44 अंश सेल्सिअसच्या आसपास गेला आहे. उष्णतेचा नागरिकांना त्रास होत असून, दुपारच्या वेळी रस्ते रिकामे दिसत आहेत.
राज्यात पुढील पाच दिवस कुठे उन तर कुठे अवकाळी
राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी कडक उन्हाळा तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात पुढील पाच दिवस काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर विदर्भात काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशाराही भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता, तापमानात दोन ते तीन अंशाची घट होणार
दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीटीची देखील शक्यता आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकेल. तर कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची घट पुढील चार दिवस बघायला मिळेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
source:- abplive