Tur rate : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत खरीप हंगामातील नव्या तुरीची अधिकृत आवक सुरू झाली असली, तरी अपेक्षेप्रमाणे दर न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याने तुरीकडून दिलासा मिळेल अशी आशा होती; मात्र मुहूर्ताच्या खरेदीत नव्या तुरीला केवळ ७ हजार रुपये प्रती क्विंटल, तर जुन्या तुरीला ६ हजार ७५० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. प्रतिकूल पावसाळ्यानंतर पोषक हवामान लाभल्याने उत्पादन चांगले होण्याची शक्यता असली, तरी मर्यादित आवक आणि अपेक्षेपेक्षा कमी दर यामुळे बाजारातील चित्र सध्या संमिश्र आहे.
विशेष म्हणजे, गतवर्षी तुरीसाठी जाहीर करण्यात आलेला हमीभाव ७ हजार ५५० रुपये प्रती क्विंटल होता; मात्र यंदा जुन्या तुरीची खरेदी हमीभावापेक्षा सुमारे हजार रुपयांनी कमी दराने होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान आणि बाजारातील चढउतार पाहता, सध्याचे दर शेतकऱ्यांच्या अपेक्षांना न्याय देणारे नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हमीभावाची प्रभावी अंमलबजावणी आणि बाजारात स्थिरता आणण्याची गरज अधोरेखित होत आहे.
यंदाच्या हंगामासाठी केंद्र शासनाने तुरीला ८ हजार रुपये प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला असला, तरी शासकीय खरेदी अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळताना दिसत नाही. परिणामी बाजारात खासगी व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असून, याचा फटका थेट उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.
जिल्ह्यात यंदा तुरीच्या पेरणी क्षेत्रात घट झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. गत हंगामात वाशिम जिल्ह्यात ६६ हजार ४३६ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती, तर यंदा नियोजित ६४ हजार ७६८ हेक्टरपैकी प्रत्यक्षात ६४ हजार २०२ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत २३४ हेक्टरने घट नोंदवली आहे. अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तुरीकडून दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना, हंगामाच्या सुरुवातीलाच मिळालेल्या कमी दरांमुळे चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे पुढील काळात बाजारभावात सुधारणा होईल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.












