Weather forecast : “महाराष्ट्रात पुढील २४ तास थंडी कायम, हवामान खात्याचा ताजा अंदाज”


 

उत्तर-पश्चिमेकडून, पाकिस्तानसह लगतच्या देशांकडून भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे उत्तर भारतासह मुंबई आणि महाराष्ट्रात पुन्हा गारठा जाणवत आहे. हवामान खात्यानुसार पुढील २४ तास ही थंडी कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होईल. मागील आठवड्यात मुंबईतील तापमान वाढले होते, तसेच दक्षिण भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामान ढगाळ राहिले. या काळात मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावून प्रदूषणाची नोंदही झाली, ज्यामुळे बदलत्या हवामानासोबत आरोग्यविषयक काळजी घेणे आवश्यक ठरत आहे.

थंडीचा प्रभाव अधिक तीव्र होत असतानाच पावसाची शक्यताही वाढली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर भारतात मंगळवारपासून थंडी आणखी वाढण्याची शक्यता असून, एकाच वेळी पश्चिमी विक्षोभाच्या दोन प्रणाली सक्रिय झाल्यामुळे २३ जानेवारीपर्यंत अनेक भागांत पावसाचा मारा होऊ शकतो. या बदलत्या हवामानामुळे थंडी, ढगाळ वातावरण आणि पावसाचा एकत्रित अनुभव येण्याची शक्यता असून, नागरिकांनी हवामानातील चढउतार लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काश्मीर खोऱ्यातील बहुतांश भागांत तापमान अजूनही शून्याखालीच असून तीव्र थंडी कायम आहे. सोनमर्ग येथे उणे ८.३ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले असून, हे सध्या येथील सर्वांत कमी तापमान मानले जात आहे. सोमवारी अनेक ठिकाणी एकांकी किमान तापमानाची नोंद झाली. हवामान खात्यानुसार पुढील तीन दिवसांनंतर तापमानात हलकी वाढ होण्याची शक्यता असली, तरी २३ आणि २४ जानेवारीला तापमान पुन्हा कमी राहील, त्यानंतर हळूहळू उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज आहे.