मुंबई : शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज (25 एप्रिल) रोजी शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती दिली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे यासंदर्भातील अहवाल सत्तार यांनी आज सुपूर्त केला. त्यामुळे कृषी विषयाचे धडे लवकरच विद्यार्थ्यांच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळणार आहे.
शिक्षण विभागाने कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल स्वीकारला आहे. यावेळी सत्तार यांनी असा विश्वास व्यक्त केला कि, ह्या निर्णयामुळे शेतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल. तसेच शेती व शेती व्यवसाय करणाऱ्यांबद्दल ज्ञान व प्रेरणा निर्माण होईल.
शालेय विद्यार्थ्यांना लहानपणापासून शेतीविषयक ज्ञान मिळाले तर पुढील जीवनात त्यांना त्याचे महत्व निश्चितच समजण्यास उपयुक्त ठरणार आहे असे मंत्री सत्तार म्हणाले. कृषी शिक्षणविषयक एकात्मिक आराखडा तयार करताना इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावी अशा पद्धतीने अभ्यासक्रम ठेवावा. कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे जे साहित्य आणि मदत लागेल, ते करण्याची कृषी विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तर शालेय अभ्यासक्रमातील इतर सर्व विषयांच्या सहसंबंधातून शेतीचे महत्व, उपयोजना, व्यवसाय संधी, शेतीविषयक जाणीव अशा अनेक पैलूंकडे लक्ष केंद्रीत करुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.
बैठकीत यांची उपस्थिती
कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ई. मु. काझी, सहसचिव (कृषी) बाळासाहेब रासकर, महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी संचालक (शिक्षण) प्रा. डॉ. उत्तम कदम, संचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर, अवर सचिव उमेश चांदिवडे आदींची यावेळी उपस्थिती होती.