जमिनीची सुपीकता टिकवून ठेवत कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न आज प्रत्येक शेतकरी करत आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या किमती आणि जमिनीच्या आरोग्यावर होणारे परिणाम लक्षात घेता जैविक पर्यायांकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे.
अशाच प्रभावी जैविक तंत्रज्ञानामध्ये मायकोरायझा (Mycorrhiza) हे अत्यंत उपयुक्त मानले जाते. वनस्पतींच्या मुळांशी सहजीवन निर्माण करणारी ही उपयुक्त बुरशी पिकांना स्फुरद (फॉस्फरस) तसेच झिंक, लोह, तांबे, मँगनीज यांसारखी महत्त्वाची सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करून देण्याचे काम करते.
त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होत असून उत्पादन आणि गुणवत्तेतही लक्षणीय वाढ होत असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात. नैसर्गिक पद्धतीने अन्नद्रव्यांचा पुरवठा करणारे हे तंत्रज्ञान भविष्यात शाश्वत शेतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
मायकोरायझा ही वनस्पतींच्या मुळांभोवती सूक्ष्म जाळे तयार करते आणि जमिनीतील अशा भागांपर्यंत पोहोचते, जिथे पिकांच्या मुळांची पोहोच होत नाही. त्यामुळे जमिनीत उपलब्ध असलेला पण पिकांना सहज न मिळणारा स्फुरद विरघळवून तो वनस्पतींना उपलब्ध करून दिला जातो.
याशिवाय झिंक, बोरॉन, लोह, तांबे आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शोषणही अधिक कार्यक्षमतेने होते. परिणामी मुळांची वाढ वेगाने होते, रोपांची जोमदार वाढ होते आणि सुरुवातीपासूनच पिकांची प्रतिकारशक्ती मजबूत राहते. विशेषतः कमी सुपीक किंवा हलक्या जमिनीत मायकोरायझाचा वापर अधिक फायदेशीर ठरत असल्याचे अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले आहे.
फळबागा, ऊस, कापूस, सोयाबीन, मका, डाळवर्गीय पिके, भाजीपाला तसेच फुलपिकांमध्ये मायकोरायझाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. रोपवाटिकेत लागवडीपूर्वी मुळांना मायकोरायझा लावणे किंवा लागवडीच्या वेळी खड्ड्यात किंवा बियाण्याजवळ त्याचा वापर केल्यास चांगले परिणाम मिळतात.
या उपयुक्त बुरशीमुळे मुळांचा विस्तार वाढतो, पाण्याचे शोषण सुधारते आणि दुष्काळी किंवा कमी ओलाव्याच्या परिस्थितीतही पिके अधिक सक्षम राहतात. त्यामुळे सिंचनाच्या मर्यादित उपलब्धतेतही पिकांची वाढ तुलनेने चांगली राहते. शिवाय रासायनिक स्फुरद खतांवरील अवलंबित्व कमी होऊन खतांचा खर्च कमी करण्यासही मदत होते.
कृषी तज्ज्ञांच्या मते, मायकोरायझाचा प्रभाव अधिक चांगला मिळविण्यासाठी दर्जेदार आणि प्रमाणित जैविक उत्पादनांची निवड करणे आवश्यक आहे. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले ठेवणे, शेणखत किंवा कंपोस्टचा वापर करणे आणि शिफारसीनुसार संतुलित खत व्यवस्थापन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. अत्याधिक रासायनिक बुरशीनाशकांचा वापर टाळल्यास मायकोरायझाची वाढ चांगली होते आणि त्याचा दीर्घकालीन फायदा मिळतो.
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी, अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर वाढवण्यासाठी आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी मायकोरायझा हे प्रभावी जैविक तंत्रज्ञान ठरत असून, आगामी काळात अधिकाधिक शेतकऱ्यांनी त्याचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचे कृषी विभागानेही अधोरेखित केले आहे.












