राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम शेतकरी सन्मान योजना 2019 मध्ये सुरु केली होती. या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ३ हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये वितरित केले जातात.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना राज्य सरकारने 2023-24 मध्ये जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत तीन हप्त्यांचे सहा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे . राज्य सरकारने चौथ्या हप्त्यासाठी 2041 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
राज्य सरकारकडून खर्चाला मान्यता..
▪️ नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी राज्य सरकारने आतापर्यंत 5512 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.
▪️ मागील वर्षी एप्रिल ते जुलै या ३ महिन्यांच्या कालावधीसाठी 1720 कोटी रुपये खर्च केले होते.
▪️ त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीसाठी 1792 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता.
▪️ 2 हजार कोटी रुपयांचा निधी डिसेंबर ते मार्च या कालावधीसाठी वितरित करण्यात आला होता.
▪️ आता शेतकऱ्यांना या योजनेचा चौथा हप्ता देण्यासाठी 2041 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून प्रशासकीय खर्चासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता लवकरच..
या योजनेच्या तीन हप्त्यांची रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. आता या योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी राज्य सरकारने खर्चाला मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे . यामुळे आगामी काळात राज्यातील शेतकऱ्यांना चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं पीएम किसान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली होती. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी हप्त्यामध्ये २ हजार रुपये मिळाले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेद्वारे 17 हप्त्यांमध्ये एकूण 34 हजार रुपयांची रक्कम पाठवण्यात आलेली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने नुकतीच राज्यातील पात्र महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून त्याद्वारे महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये पाठवण्यात येणार आहेत. दोन महिन्यांची रक्कम आतापर्यंत जमा करण्यात आलेली आहे.