शेतकरी रामचंद्र दगुजी चुंभळे हे पाथर्डी (गौळाणे रस्ता) (जि. नाशिक) येथील रहिवासी आहेत. ते २३ वर्षांपासून द्राक्षशेती करत आहेत. त्यांनी निवड पद्धतीने ‘उत्कर्षा’ या नावाने काळ्या रंगाचा वाण विकसित केला आहे. या वाणाला शेतकरी अधिकार प्राधिकरणाकडून व केंद्रीय कृषी विभागाच्या पीक वाण संरक्षणकडून नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यानुसार वाणाचे सर्वाधिकार त्यांना प्राप्त झाले आहेत.
बेंगलोर डॉग्रिज या खुंटावर लागवड केलेल्या ‘शरद सिडलेस’ जातीच्या द्राक्षबागेत निरीक्षण करताना श्री. चुंभळे यांना २०१७ मध्ये एक वेगळी वेल आढळून आली. द्राक्षवेलीच्या दोन भागांमध्ये उत्पादनसंबंधी वेगवेगळे परिणाम दिसत होते.
त्यातील एका ओलांड्यावर अधिक प्रमाणात मोठ्या मण्यांसह घड दिसून आले. याबाबत सलग तीन वर्षे निरीक्षण त्यांनी केले . चुंभळे यांना पारंपरिक ‘शरद सिडलेस’ वाणापेक्षा त्यामध्ये वेगळी वैशिष्ट्ये आढळून आली. असे परिणाम त्यांनी सलग तीन वर्षे अभ्यासले.
पुढे त्यांनी २०१८ मध्ये या वेलीवरील काड्यांपासून १५ रोपे तयार करून लागवड केली. व त्याचे परिणाम चांगले दिसून आल्यानंतर पुढे पुन्हा काडी काढून रोपे तयार केली. त्यापासून दीड एकरांवर २०२० मध्ये लागवड केली. या वाणाच्या लागवड क्षेत्रावर पुणे येथील राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. रोशनी समर्थ यांनी सलग दोन वर्षे भेटी देऊन निरीक्षणे व परिणाम नोंदविले.
त्यानंतर १२ जुलै २०२२ रोजी भारत सरकारच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे ‘उत्कर्षा’ या नावाने द्राक्ष वाणाच्या अधिकार हक्कासाठी अर्ज जमा केला. प्रायोगिक निष्कर्ष, सर्व अभ्यास, नोंदी- तपशीलांची खातरजमा झाली. त्यानुसार १८ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘उत्कर्षा’ वाणाचे कायदेशीर मालकी अधिकार हक्क चुंभळे यांना देण्यात आले. तसे अधिकृत प्रमाणपत्रही नुकतेच त्यांना देण्यात आले आहे.
चुंभळे यांनी आपल्या मुलीचे नाव या वाणाला दिले आहे. सर्व हक्क प्राप्त अधिकार हक्कानुसार चुंभळे यांच्या संमतीशिवाय या वाणाच्या रोपाची निर्मिती, वितरण आयात, निर्यात ,विक्री, जाहिरात, कोणालाही परस्पर करता येणार नाही.
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, त्यांचा परिवार व वासुदेव काठे यांचे मदत व मार्गदर्शन त्यांना मिळाले . राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. एस. डी. रामटेके यांनीही त्यांच्या बागेला भेटी दिल्या आहेत.
उत्कर्षा वाणाची वैशिष्ट्ये :
– पानांना जास्त हिरवेपणा.
– गर्भधारणा वा पीकवाढीसाठी संजीवके, जीए,वाढ नियंत्रके, आदींची कमी गरज
– सबकेन व काटेकोर सिंचन व्यवस्थापन महत्त्वाचे.
– इतर काळ्या वाणांच्या तुलनेत ‘पीजीआर’ घटकांची आवश्यकता २५ टक्के कमी.
– जवळपास ५० ते ८० दरम्यान एका वेलीवर घड धारणाक्षमता.
– मण्यांचा आकार २२ मिमीपर्यंत.
– गर हलकासा पातळ व लवचिक असल्यामुळे तडे जाण्याची समस्या अन्य पारंपरिक काळ्या वाणाच्या तुलनेत कमी
– द्राक्षमण्याला अधिक गोडी आणि मण्यावरील साल पातळ.
– गोडी बहर छाटणीपश्चात चार ते सव्वा चार महिन्यामध्ये काढणीस येणारा वाण.
– एकरी १० टन उत्पादन
नव्या वाणाचे उत्पादन गेल्या दोन वर्षांपासून सुरू झाले आहे. नेपाळ व बांगलादेश व्यापाऱ्यांकडून गोडी व आकार असल्याने पसंती मिळाली आहे. आता पुढील ७ ते ८ दिवसांत प्रक्षेत्र दिवस घेऊन शेतकऱ्यांना पाहणीसाठी बोलावणार आहे.
– रामचंद्र चुंभळे, ९८२२६१२८७३, ९८२२६१२८७३