Narendra Modi : मस्साजोग खून प्रकरणानंतर वादाच्य भोवऱ्यात सापलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय या प्रकरणी दिवसेंदिवस खोलात जात असून अलिकडेच बीडमधील राष्ट्रवादीची कार्यकारिणी सुनील तटकरे यांनी बरखास्त केल्याने पक्षातूनच त्यांच्यावर कारवाईचे संकेत मिळत आहे.
दुसरीकडे मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदारांच्या बैठकीत या प्रकरणी सूचक संकेत दिल्याने लवकरच मुंडे यांच्या अडचणी वाढतील आणि प्रसंगी त्यांच्यावर कारवाईही होईल अशी जोरदार शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
दरम्यान अलिकडेच कोल्हापूरत भाजपाचे जे अधिवेशन झाले, त्यातही गृहमंत्री अमित शाह यांनी आमदार, मंत्री यांच्या चारित्र्य आणि वर्तवणुकीवरून कानपिचक्या दिल्या होत्या. त्यानंतर चारच दिवसांनी राज्यात आलेल्या पंतप्रधान मोदीजींनी याच विषयावर भाष्य केल्याने आणि राष्ट्रवादीनेही बीडची कार्यकारिणी बरखास्त केल्याने धनंजय मुंडे यांना मंत्रीपद सोडावे लागू शकते अशी अटकळ बांधली जात आहे.
मुंबईत इस्कॉन मंदिराच्या उदघाटनाला आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बुधवारी राज्यातील आमदारांचाही वर्ग घेतला. त्यातून त्यांनी आमदारांना जनतेची कामे कशी करावी, लोकांमध्ये कसे मिसळले पाहिजे? पदाचा अभिमान सोडणे यासह चारित्र्य आणि वर्तणूक यांचाही उल्लेख करत त्यांनी आमदारांना सूचना केल्या.
दरम्यान या वर्गाला सध्या चर्चेत असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांनी अनुपस्थिती होती. छगन भुजबळ यांच्यासह सेना, राष्ट्रवादीच्या काही आमदारांचीही अनुपस्थिती होती. मात्र सर्वाधिक चर्चेत ठरली, ती मंत्री धनंजय मुंडे यांची गैरहजेरी. परळीला असल्याने येऊ शकले नाही असे सांगितले जात असले, तरी राजकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार ज्यांच्यावर आरोप आहेत आणि जे सध्या वादग्रस्त आहेत, अशा लोकांना पंतप्रधानांच्या या वर्गापासून दूर ठेवावे अशा अंतर्गत सूचना असल्याचे समजते. याला पुष्टी मिळाली, नसली तरी सध्या याच्या चर्चा सुरू आहे.
लवकरच शिर्डी येथे राष्ट्रवादीचे अधिवेशन असून त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात ठोस निर्णय होऊ शकतो असे सांगितले जात आहे.












