Irrigation project : राज्यातील ‘या’ सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीला मंजुरी; हजारो शेतकऱ्यांना दिलासा..

Irrigation project : वर्धा जिल्ह्यातील दोन महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प – बोर (ता. सेलू) आणि धाम (ता. आर्वी) – यांच्या दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४२८ कोटी ९६ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नियमित, कार्यक्षम आणि वाजवी पाण्याचा पुरवठा मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे.

वर्षानुवर्षे वापरामुळे आणि हवामानातील बदलांमुळे या दोन्ही प्रकल्पांच्या कालवा व्यवस्था मोठ्या प्रमाणावर जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय वाढला असून, अनेक वेळा शेवटच्या टप्प्याच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. या पार्श्वभूमीवर ही दुरुस्ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक ठरत होती.

बोर प्रकल्प वर्धा नदीवर १९६७ मध्ये बांधण्यात आला होता. याचा उपयुक्त पाणीसाठा १२३.२१२ दशलक्ष घनमीटर असून, सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्र या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचित होते. मात्र २४० किलोमीटर लांबीची कालवा व वितरिका प्रणाली जीर्ण झाल्याने पाणी थेट शेतीपर्यंत पोहोचताना अडचणी निर्माण होत होत्या. दुरुस्तीमुळे आता या प्रणालीतून होणारी पाणीगळती थांबेल आणि शेवटच्या शेतकऱ्यालाही वेळेवर पाणी मिळण्याची शक्यता वाढेल. यामुळे पिकांचे उत्पादन, त्याचे दर्जा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल.

धाम प्रकल्प १९८६ मध्ये महाकाळी गावाजवळील धाम नदीवर उभारण्यात आला होता. त्याच्या माध्यमातून ७ हजार ९० हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. या प्रकल्पातील २३० किलोमीटर लांबीचे कालवे, उपवितरिका आणि धरणाशी निगडित रस्ते व संरचना देखील जीर्णावस्थेत आल्या होत्या. त्यामुळे अनेक वेळा पाणी योग्य प्रमाणात शेतीपर्यंत पोहोचत नव्हते. दुरुस्तीमुळे पाण्याचा वापर अधिक कार्यक्षम पद्धतीने करता येईल.

ही दोन्ही कामे विशेष दुरुस्ती योजनेंतर्गत केली जाणार आहेत. यामुळे वर्धा जिल्ह्यातील अनेक गावांमधील शेतकरी शेतीसाठी अवलंबून असलेले पाणी आता अधिक योजनाबद्ध आणि विश्वासार्ह पद्धतीने मिळेल. याचा थेट फायदा खरीप, रब्बी आणि बारमाही पिकांच्या उत्पादनावर होणार असून, जिल्ह्यातील शेतीच्या टिकावू विकासाला मोठा आधार मिळणार आहे.