Onion export : भारतातून कांदा निर्यातीबाबत बांग्लादेशातून आली मोठी बातमी..

onion export : बांगलादेशमध्ये कांद्याचे दर (kanda bajar bhav) सध्या चांगल्या पातळीवर असून, भारतातून कांद्याची निर्यात लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आपल्याकडील शेतकऱ्यांमध्ये आहे. महाराष्ट्रात उन्हाळी कांद्याचे दर सध्या घसरले आहेत. त्यामुळे जर बांगलादेशात निर्यातीला सुरुवात झाली, तर देशांतर्गत बाजारात भाव वाढतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी आशा आहे. मात्र, अद्याप भारताकडून बांगलादेशात कांदा पाठवला गेलेला नाही.

सध्या बांगलादेशात स्थानिक कांद्याचे दर प्रकारानुसार ३४ रुपये ते ४४ रुपये किलोपर्यंत आहेत. सर्वसाधारणपणे दर ३७ ते ४० रुपयांच्या दरम्यान आहेत. यामध्ये राजशाही, पबना, फरीदपूर, आणि सुखसागर या प्रांतातील देसी व हायब्रीड कांद्यांचा समावेश आहे. किंमती तुलनेने अधिक असूनही स्थानिक शेतकरी कांदा बाजारात विकायला तयार नाहीत. त्यांना वाटते की सध्याचा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत पुरेसा नाही. त्यामुळे कांदा साठवून ठेवून ते योग्य संधीची वाट पाहत आहेत.

बांग्लादेशमधील कांदा भाव
* राजशाही देशाल कांदा: 53–54 टका प्रति किलो (₹40–₹41)
* फरीदपूर हायब्रीड कांदा: 58 टका (₹44.50)
* पबना हायब्रीड/देसी कांदा: 56–57 टका (₹43–₹44)
* सुखसागर कांदा (मोटा): 54–55 टका (₹41.50–₹42)
* सुखसागर कांदा (बारीक): 45–46 टका (₹34.50–₹35)
* किंग मिश्र कांदा: 46–47 टका (₹35–₹36)
* सर्वसाधारण दर: 48–52 टका (₹37–₹40)

बांग्ला शेतकऱ्यांची अशी आहे स्थिती:
बांगलादेशातील काही शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्यावर ३०,००० रुपयांपर्यंत नुकसान सहन करावे लागले आहे. खत, मजुरी, वाहतूक यांचे खर्च वाढल्यामुळे शेती फायदेशीर राहत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. काही जण तर शेती बंद करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे कांद्याला चांगला दर मिळावा यासाठी त्यांची मोठी अपेक्षा भारतातून होणाऱ्या निर्यातीवर आहे.

स्थानिक व्यापारी मात्र या निर्यातीबाबत सावध भूमिका घेत आहेत. त्यांना वाटते की भारतातून कांदा आयात झाला, तर देशांतर्गत कांद्याचे दर घसरणार आणि त्यामुळे बांगलादेशातील शेतकऱ्यांचे नुकसान होईल. सध्या बांगलादेश सरकारने भारतीय कांद्याला परवानगी दिलेली नाही, कारण त्यांना आपल्या शेतकऱ्यांचे हित जपायचे आहे. मात्र, जर येथील दर ६० ते ६५ रुपये किलोपर्यंत पोहोचले, तर सरकार आयातीस परवानगी देण्याचा विचार करू शकते. काही व्यापाऱ्यांचे असेही मत आहे की पुढील आठवड्यात भारतीय कांदा बाजारात दिसू शकतो.

असे असले तरी एका बांग्ला युट्यूबने दिलेल्या माहितीनुसार ढाका येथील होलसेल मार्केटच्या व्यापाऱ्यांनी ही निर्यात ऑगस्टमध्ये सुरू होऊ शकते असे सांगितले जात आहे. अर्थात याला दोन्ही देशांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

भारतात १ एप्रिलपासून कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे निर्यात व्यवहार सुलभ झाले आहेत. मात्र तरीही भारतातून बांगलादेशात निर्यात सुरू झालेली नाही. यामुळे दोन्ही देशांतील कांदा बाजार सध्या अनिश्चिततेच्या टप्प्यावर आहे. बांगलादेश सरकारने पाकिस्तान, चीन, तुर्की यांसारख्या देशांकडून आयातीचा पर्यायी मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. पण भारतापासूनचा मार्ग सोपा आणि स्वस्त असल्यामुळे बांगलादेशातील व्यापाऱ्यांना त्याच्याकडूनच कांदा मिळावा, असे वाटते.

आता लक्ष लागले आहे ते बांगलादेश सरकारच्या पुढील निर्णयावर. जर निर्यातीला परवानगी दिली गेली, तर दोन्ही देशांतील बाजार स्थिर होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांनाही दिलासा मिळू शकतो.