Jagdeep Dhankhar: उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर चर्चांना उधाण; अशातच पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य..




 Vice President : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी २१ जुलै २०२५ रोजी अचानक राजीनामा दिल्याने देशात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी वैद्यकीय कारणे सांगत पदाचा राजीनामा दिला असून, हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तत्काळ स्वीकारला आहे. उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपण्यास अजून दोन वर्षे बाकी असताना घेतलेला हा निर्णय अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोंदींचे या बद्दल महत्त्वाचे वक्तव्य पुढे आले आहे.

धनखड यांनी पत्राद्वारे राष्ट्रपतींना राजीनामा सादर केला असून, त्यामध्ये त्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक झाल्याचे म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची तब्येत ठिक नसल्याचे बोलले जात होते. मार्च महिन्यात त्यांना हृदयविकाराशी संबंधित त्रास झाल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या अधिकृत दौऱ्यांमध्येही कपात करण्यात आली होती.

धनखड यांच्या राजीनाम्याची बातमी संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समोर आली. त्यावेळी राज्यसभेत ते उपस्थित नव्हते आणि अचानक संध्याकाळी त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यामुळे हा निर्णय नियोजित होता की तात्काळ घेतलेला, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. विरोधी पक्षांनीही त्यांच्या राजीनाम्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, हे केवळ आरोग्याचे कारण असावे असे वाटत नाही, काही अंतर्गत दबावामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे.

काय म्हणाले पंतप्रधान:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगदीप धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की जगदीप धनखड यांना देशाच्या उपराष्ट्रपती पदासह इतर अनेक पदांच्या माध्यमातून आपल्या देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात, “जगदीप धनखड यांना देशाच्या उपराष्ट्रपती पदासह इतर अनेक पदांच्या माध्यमातून आपल्या देशाची सेवा करण्याची संधी मिळाली . त्यांना माझ्यातर्फे उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा.”

पुढील उपराष्ट्रपती कोण?
राजकीय वर्तुळात यानंतरच्या उपराष्ट्रपती पदासाठी संभाव्य नावांची चर्चा सुरू झाली आहे. एनडीएकडून राज्यसभा उपसभापती हरिवंश यांचे नाव पुढे येत आहे. दरम्यान, नवीन उपराष्ट्रपतीची निवड करण्यासाठी लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद ६६ नुसार उपराष्ट्रपतीची निवड केली जाते. हा निवडणूक कार्यक्रम येत्या आठवड्यांत घोषित केला जाऊ शकतो.

जगदीप धनखड यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२२ मध्ये सुरू झाला होता. त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून अनेक महत्वाचे निर्णय घेतले. न्यायव्यवस्थेवरील टिप्पण्या आणि संसदेतील कठोर कारवाईमुळे ते कायम चर्चेत राहिले. आता त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे देशाच्या उच्च राज्यघटक पदावर मोठा बदल घडून आला असून, त्याची राजकीय परिणती काय होईल हे पाहावे लागेल.