Kharif crop : यंदाच्या खरीपात ऊस वाढला, सोयाबीन घटले; जाणून घ्या पीक पेऱ्याची माहिती

Kharif crop : खरीप हंगाम २०२५ मध्ये १८ जुलैपर्यंत देशात एकूण ७०८.३१ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ६८०.३८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. म्हणजे यंदा एकूण पेरणी क्षेत्रात २७.९३ लाख हेक्टरने वाढ झाली आहे. मात्र ही वाढ सर्व पिकांमध्ये समान नसून काही पिकांचे क्षेत्र वाढले आहे तर काही पिकांमध्ये घटही झाली आहे.

धानाचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे १९.४७ लाख हेक्टरने वाढून यंदा १७६.६८ लाख हेक्टर झाले आहे. ज्वारी, बाजरी, मका व अन्य भरडधान्यांचे एकत्रित क्षेत्र १५.९९ लाख हेक्टरने वाढून १३३.६५ लाख हेक्टर झाले आहे. या गटात मक्याचे क्षेत्र सर्वाधिक ९.४८ लाख हेक्टरने वाढले आहे, तर बाजरीचे ६.८५ लाख हेक्टरने वाढले. डाळींचे क्षेत्र देखील ८१.९८ लाख हेक्टरवर पोहोचले असून त्यात १.८४ लाख हेक्टरची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामध्ये मूग (मगू) आणि मटकी या पिकांचे क्षेत्र अनुक्रमे २.७९ आणि २.६१ लाख हेक्टरने वाढले आहे.

दुसरीकडे काही पिकांमध्ये घटही झाली आहे. यामध्ये सोयाबीनचा पेरा सर्वाधिक म्हणजे ७.२९ लाख हेक्टरने कमी होऊन १११.६७ लाख हेक्टरवर आला आहे. तेलबियांमध्ये एकूण ६.०४ लाख हेक्टरची घट नोंदवली गेली असून त्यामध्ये कारळा, नाचणी आणि इतर हलकी भरडधान्ये यांचाही समावेश आहे. उडीदाचा पेरा २.०६ लाख हेक्टरने कमी झाला आहे, तर तुराचाही पेरा १.६१ लाख हेक्टरने घटला आहे.

ऊसाच्या पेरणी क्षेत्रात मात्र वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऊसाचे क्षेत्र ५४.८८ लाख हेक्टर होते, ते यंदा ५५.१६ लाख हेक्टर झाले असून त्यात ०.२९ लाख हेक्टरची वाढ नोंदवण्यात आली आहे.

एकूणच यंदाच्या खरीप हंगामात पावसाचा चांगला सुरुवातीचा जोर असल्यामुळे अनेक पिकांची पेरणी वेळेत झाली आहे. तथापि, काही पिकांचे भाव व बाजारातील अनिश्‍चिततेमुळे किंवा स्थानिक हवामान स्थितीमुळे विशिष्ट पिकांचा पेरा घटल्याचे दिसते. यामुळे शेतकऱ्यांनी पुढील हवामान व बाजारभाव लक्षात घेऊन पीकनिवड करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.