भारत हा कृषी प्रधान देश आहे शेतीला शाश्वत करण्यासाठी शेतीच्या आधुनिकरण आणि यांत्रिकीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो.
कृषी अभियांत्रिकी शाखेमध्ये अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान कृषी यंत्रे व शक्ती जलसिंचन व निचरा जलसंधारण, अपारंपारिक ऊर्जा असे प्रमुख विभाग आहेत. अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान विभागामध्ये विविध अन्नपदार्थांची प्रक्रिया ,हाताळणी, संवर्धन ,साठवणूक, पॅकेजिंग ,नियंत्रण व वितरण इत्यादी बाबींचा समावेश होतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अन्नपदार्थाचे निर्जंतुकीकरण, निर्जलीकरण ,साठवण, कालावधी वाढविणे, तसेच पोषक घटकांचे जतन, संरक्षणात्मक पॅकेजिंग, इत्यादींच्या माध्यमातून अन्नपदार्थांचे मूल्यवर्धन करता येते. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादन खर्च कमी होऊन अन्नपदार्थाची दीर्घकाळ साठवून करणे शक्य होते.
अन्नप्रक्रिया उद्योगातील विविध खाजगी कंपन्यांमध्ये तज्ञ आणि कुशल मनुष्यबळांची गरज दिवसेंदिवस वाढत असते .त्याच अनुषंगाने कृषी अभियांत्रिकी अंतर्गत अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना विविध करिअर संधी उपलब्ध होतात.
प्रवेश प्रक्रिया
बारावीनंतर बी टेक कृषी अभियांत्रिकी हा चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे. या अंतर्गत कृषी अन्न प्रक्रिया व तंत्रज्ञान विद्याशाखेचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येतो. भारतातील विविध कृषी विद्यापीठाअंतर्गत हा अभ्यासक्रम राबवण्यात येतो. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावी मध्ये विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होऊन एमएचटी ,सीईटी, जेईई या सामायिक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे.
करियर संधी
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विविध प्रक्रिया उद्योगांमध्ये तसेच विविध केंद्रीय व राज्यस्तरीय यांना संशोधन संस्थांमध्ये वैज्ञानिक म्हणून नोकरीच्या संधी आहेत. यासोबतच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अन्न व औषध प्रशासन (फूड इन्स्पेक्टर) भारतीय खाद्य निगम कृषी कार्यालय अन्नसुरक्षा अधिकारी तसेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच पदवीधर विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात.