
येणाऱ्या रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांवरील अनुदान दर निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली असून, शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने रब्बी हंगामात 2023 24 साठी 1- 10 -2023 ते 31 -3- 2024 फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतावर पोषण आधारित अनुदान (NBS) दर निश्चित करण्यासाठी खत विभागाने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
दरम्यान या अनुदानासाठी साधारण 22 हजार 303 कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे. तर शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत या खतांची सुरळीत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅशियम या खतांवर अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यावर्षीचा रब्बी हंगाम 01.10.2023 ते 31- 3-2024 या दरम्यान असून या काळातच हे अनुदान देण्यात येणार आहे.
किती मिळणार अनुदान..
खतांचा प्रकार प्रति किलो मिळणारे अनुदान..
नायट्रोजन (युरिया) – 47.02 रूपये प्रतिकिलो
फॉस्फरस – 20.82 रूपये प्रतिकिलो
पोटॅश – 2.38 रूपये प्रतिकिलो
सल्फर – 1.89 रूपये प्रतिकिलो.
केंद्र सरकारने खतावर जाहीर केलेल्या २२ हजार ३०३ कोटींच्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून डीएपी खत १३५० रुपये प्रति बॅग या दराने मिळणार आहे. त्याचबरोबर एनपीके १४७० रुपये बॅग याप्रमाणे खते मिळणार आहेत. अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
युरिया, डीएपी, एमओपी आणि सल्फर या खतांच्या आणि इतर कृषी मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतीमधील अलीकडील कल लक्षात घेता सरकारने हा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते उपलब्ध होण्यासाठी खत कंपन्यांना मंजूर आणि अधिसूचित केलेल्या दरानुसार अनुदान दिले जाईल.