भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत रविवारी (दि. १९) नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनने निकोबार बेटांवर धडक दिली. मान्सूनने रविवारी बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग, मालदीवचा काही भाग, दक्षिण अंदमान निकोबार आणि द्वीप समूह समुद्राच्या काही भागापर्यंत मजल मारल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली .
सध्याचे पोषक हवामान पाहता मान्सून ३१ मेपर्यंत केरळला, तर महाराष्ट्रात ६ ते १० जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली.यंदा देशात सामान्यपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज ‘ला नीना’ च्या अनुकूल परिस्थितीमुळे हवामान विभागाने वर्तविला होता, मागील वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होता, तर यावर्षी तो संपुष्टात येत आहे.
त्यामुळे ‘ला निना’ची स्थिती तीन ते पाच आठवड्यांत निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ३१ मे केरळमध्ये , तर दक्षिण कोकणात ५ जून रोजी दाखल होईल तसेच विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये १५ जून अगोदर मान्सून प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
रेड अलर्ट देण्यात आला..
सध्या कमाल तापमानाने उच्चांक देशातील अनेक राज्यांमध्ये गाठला आहे. तर काही भागात पारा ४८ अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. पुढील चार दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा रेड अलर्ट दिल्लीसह, हरयाणा,पंजाब, चंडीगडसह राजस्थानच्या काही भागात देण्यात आला आहे. त्याशिवाय गुजरात, पूर्व राजस्थान, बिहारच्या काही भागांतही, उत्तर प्रदेशचा काही भाग, कमाल तापमान वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
चार वर्षातील केरळमधील आगमन
८ जून – २०२३
२९ मे – २०२२
३ जून – २०२१
१ जून – २०२०
सर्वात लवकर – १९१८ (११ मे)
सर्वात उशिरा – १९७२ (१८ जून)
मान्सूनचा प्रवास सुरू झाला आहे , तो सुरळीतपणे पुढे सरकेल, कोणताही अडथळा त्यामध्ये येणार नाही. २२ मे पासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि मान्सूनला ते पोषक ठरेल
– डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ