
PF account : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ)तर्फे नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी सुविधा जाहीर करण्यात आली आहे. आता पीएफ खातं नवीन नोकरीत गेल्यावर आपोआप तिकडे हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे वेगळा अर्ज, नियोक्त्याची स्वाक्षरी किंवा कार्यालयाची धावपळ टाळता येणार आहे.
नवीन काय बदललं आहे?
पूर्वी जेव्हा कर्मचारी नोकरी बदलायचा, तेव्हा पीएफ हस्तांतरणासाठी अर्ज भरावा लागायचा आणि तो जुना व नवा नियोक्त्याच्या- संस्थेच्या मंजुरीनंतरच पुढे जायचा. आता मात्र ईपीएफओने ही प्रक्रिया सुलभ केली आहे. आता जुने कार्यालय म्हणजे जिथे पीएफ जमा झाला होता तिथूनच मंजुरी मिळाली की रक्कम थेट नवीन नोकरीच्या खात्यात जमा होते. नवीन कार्यालयाकडून वेगळी मंजुरी लागणार नाही.
यामुळे काय फायदा होतो?:
– हस्तांतरण पटकन होते, महिन्योनमहिने थांबावं लागत नाही.
– कर्मचाऱ्यांचा वेळ आणि त्रास वाचतो.
– पीएफमधील करपात्र आणि करमुक्त रकमेची अचूक विभागणी होते.
– व्याजावर लागणारा टीडीएस अचूक आकारला जातो.
– भविष्यकाळात पीएफ सेटलमेंट वेगानं आणि सोपं होतं.
नवीन यूएएन मिळवणं आता सोपं:
ज्यांनी आधी काम केलं आहे पण आधार कार्ड लिंक केलं नव्हतं, त्यांच्यासाठीही दिलासादायक बातमी आहे. आता आधारशिवायसुद्धा यूएएन तयार होणार आहे, ज्या आधारावर मागील जमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करता येईल. ही प्रक्रिया सध्या स्थिर (गोठवलेल्या) स्थितीत राहणार आहे आणि आधार लिंक केल्यानंतरच पूर्णपणे सक्रिय होईल.
या बदलांमुळे कर्मचाऱ्यांना पीएफच्या रकमेवर अधिक नियंत्रण मिळणार आहे. आर्थिक नियोजन करायला अचूक माहिती मिळते, रक्कम वेळेवर उपलब्ध होते आणि नोकरी बदलल्यानंतर तणाव किंवा सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची गरज राहत नाही.
ईपीएफओने केलेले हे बदल म्हणजे “जीवन सुलभतेचा” उत्तम नमुना आहे. कर्मचारी अधिक स्मार्ट, वेगवान आणि अचूक पद्धतीने आपले पीएफ व्यवहार करू शकतील. विशेष म्हणजे, याचा फायदा दरवर्षी लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे.