बोगस बियाण्यांच्या घुसखोरीसह अतिरिक्त पैसे आकारण्याच्या तक्रारी लक्षात घेता यवतमाळ जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नंबरवर तक्रार करता येणार आहे.त्यांचे नाव गोपनीय ठेवता येणार आहे. तक्रारीची तत्काळ दखल घेतली जाणार आहे. या तक्रारीची शहानिशा करून कारवाई केली जाणार आहे.
खरीप हंगामात यावर्षी नऊ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. यासाठी २४ लाख पॅकेट कपाशीचे बियाणे जिल्ह्यामध्ये लागणार आहे.यासोबतच विविध पिकांचे बियाणे लागणार आहे. गाव पातळीवर बियाणे विक्री करताना शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचा धोका आहे. या बियाणे फसवणुकीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने ९४०३२२९९९१ हा टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. कृषीविषयक तक्रारी शेतकऱ्यांना या नंबरवर नोंदविता येणार आहे. फोन कॉल फ्रीमध्ये यामध्ये करता येणार आहे. या व्यतिरिक्त ही संपूर्ण माहिती राज्यस्तरावर नोंदविली जाणार आहे.
जिल्हा स्तरावर यानंतर याबाबतची माहिती दिली जाणार आहे. यामुळे कृषी विभागावर तक्रारीतील वास्तव जाणण्याची जबाबदारी येणार आहे. यातून गाव पातळीवरील गैरप्रकार तत्काळ बंद करण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यासाठी हा क्रमांक वरदान ठरणारा राहणार आहे.कृषी विभागाला टोल फ्री नंबरमुळे वेळेपूर्वीच गैरप्रकाराची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. यासोबतच माहिती सांगणाऱ्याचे नाव उघड करण्यात येणार नाही . यामुळे सर्वांनाच हा टोल फ्री क्रमांक उपयोगी पडणार आहे.
बोगस बीटी अन् खत.
मोठ्या प्रमाणात बोगस बीटी बियाण्याची घुसखोरी जिल्ह्यात होते.छुप्या मार्गाचा यासाठी अवलंब होतो. शेतकऱ्यांना याविषयाची टोल फ्री नंबरमुळे गोपनीय माहिती देता येणार आहे. यातून बोगस बीटी अथवा बोगस खतासारख्या प्रकाराला रोखण्यास मदत होणार आहे.