
कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना जाहीर केलेला प्रति हेक्टरी ५ हजार मदतीचा शासन निर्णय आता सरकारने काढला आहे. सोयाबीनला आणि कापसाला २ हेक्टरच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे. म्हणजेच २ हेक्टरसाठी एका शेतकऱ्याला १० हजार रुपये मिळणार आहेत. तर वीस गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्र असेल तर किमान १ हजार रुपये मिळतील, असेही या शासन आदेशामध्ये सांगितले आहे .
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेमध्ये ५ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. शेतकरी तेव्हापासून ही मदत केव्हा मिळणार याची वाट पाहत होते. परंतु शेवटी सरकारने २९ जुलै रोजी या मदतीच्या वाटपाला मंजुरी देण्यात येऊन शासन आदेश काढला.
कोणते शेतकरी असतील पात्र
खरिप हंगाम २०२३ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पीक घेतले होते व त्याची नोंदणी ई-पीक पाहणी अॅप किंवा पोर्टवर केली होती तेच शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र ठरणार आहेत. म्हणजे खरिप हंगाम २०२३ मध्ये शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन आणि कापूस पिकाची ई-पीक पाहणी केलेली असेल, तरच या योजनेअंतर्गत पात्र ठरतील. तसेच शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीमध्ये जेवढ्या क्षेत्राची नोंदणी करण्यात आली आहे तेवढ्याच पिकासाठी ही मदत मिळणार आहे.
कशी मिळणार मदत?
२० गुठ्यांपेक्षा क्षेत्र कमी असेल तर सरसकट १ हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. असे सरकारने म्हटले आहे . तर २० गुंठ्यांपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर त्यानुसार मदत देण्यात येईल . एक एकर क्षेत्र एखाद्या शेतकऱ्याचे असेल तर त्याला २ हजार रुपये मिळतील. दीड एकर असेल तर ३ हजार, २ एकर असतील तर ४ हजार आणि अडीच एकर म्हणजेच एक हेक्टर क्षेत्र असेल तर ५ हजार रुपये याप्रमाणे मदत मिळणार आहे . ही मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यात वितरित करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार?
राज्यातील कापूस उत्पादकांना मदत देण्यासाठी १ हजार ५४८ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे . असे सरकारने स्पष्ट केले आहे ,तसेच सोयाबीन उत्पादकांसाठी दोन हजार ६४६ कोटींची मदत देण्यात येईल म्हणजेच राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना ४ हजार १९४ कोटी रुपये देण्यात येणार आहे .