*Maharashtra Cabinate expansion: राज्यातील सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर अखेरीस उद्या रविवार दिनांक १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दरम्यान १४ डिसेंबर रोजी राजभवन, मुंबई येथे होणारा हा विस्तार आणि शपथविधी नागपूरला होणार असल्याचे समजते.
सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन असल्याने नागूपरलाच मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी आयोजित करणे सोपे जाणार असल्याने हा विस्तार एक दिवस लांबणीवर पडला आहे.
दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारात अजूनही खाते वाटपाचा घोळ कायम असूनही शिंदे गट आणि अजित पवार गट दोघांनाही महत्त्वाची खाती हवी आहेत. तसेच जास्तीत जास्त संख्येने मंत्रिपदे मिळावीत असा त्यांचा आग्रह आहे.
नगरविकास मंत्रालयासोबतच महसूल खाते एकनाथ शिंदे गटाला पाहिजे आहे. मात्र त्यावर अजूनही संमती झालेली नाही. दरम्यान राज्यात महत्त्वाचे समजले जाणारे कृषी खाते एकनाथ शिंदे गटाकडे येण्याची शक्यता आहे. या आधीही त्यांच्याकडे ते खाते होते. पण खात्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांची कारगिर्द वादग्रस्त ठरल्याने त्यांच्याकडून ते काढून घेऊन नंतर अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांना देण्यात आले.
उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे सरकार असताना त्यावेळेस कृषी मंत्रीपद दादाजी भुसे यांच्याकडे होते. त्यांची कामगिरीही समाधानकारक होती. सध्या दादाजी भुसे हे शिंदे गटात असून एकनाथ शिंद यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे जर एकनाथ शिंदे यांना कृषी सारखे महत्त्वाचे खाते मिळाले, तर शेतकरी कुटुंबातील असलेल्या नाशिकच्या दादाजी भुसे यांना ते मिळू शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात असून उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरच याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.












