Maharashtra Cabinet : राज्यात दिनांक ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी तर दोन उपमुख्यमंत्रीपदी अनुक्रमे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ ग्रहण केली. त्यानंतर लगेचच कार्यभार स्वीकारून पहिली मंत्रिमंडळ बैठकही झाली. असे असले तरी अजूनही खातेवाटप झाले नसल्याने संपूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेले नाही.
अशाच दिनांक १५ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार असून त्याआधी मंत्रिमंडळ तयार होणे आणि खाते वाटप होणे आवश्यक आहे. भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले असून कुणाला मंत्री करणार किंवा संभाव्य मंत्रीमंडळ कसे असेल याचेही संकेत दिलेले आहेत.
प्रत्यक्षात सामान्य जनतेला कुठल्या तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी कृषी २४ ला दिलेल्या माहितीनुसार आज किंवा उद्या मंत्रिमंडळ ठरणार असून ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. अर्थात याला अजून अधिकृत पुष्टी मिळाली नसली, तरीही साधारणत: याच तारखेच्या जवळपास मंत्री शपथ घेतील अशी अटकळ बांधली जात आहे












