Agriculture Department’s : शेतीमध्ये आधुनिक एआय तंत्रज्ञान आणण्याचे दावे करणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाची वेबसाईटच अनेक दिवसांपासून बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. सध्या अनेकांना ही वेबसाईट ओपन होण्यात अडचणी येत असून कुठल्याही प्रकारच्या संगणक किंवा ब्राऊझरचा वापर केला तरी ही साईट उघडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना माहितीपासून वंचित राहावे लागत आहे.
राज्यात नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रशासकीय कामकाजात समावेश करण्याचे आश्वासन दिले खरे, पण प्रत्यक्षात ज्या ठिकाणाहून शेतकरी आणि सामान्यांना माहिती मिळायला हवी, तेच संकेतस्थळ बंद असल्याने ही आहे ते चालू करा मग एआयचे स्वप्न दाखवा असे शेतकरी म्हणत आहेत.
राज्याच्या कृषी संकेतस्थळ सुरक्षित नसल्याचे अनेक ब्राऊझर दाखवत असून ते उघडण्यास मनाई करत आहे. मात्र दुसऱ्या ब्राऊझरचा वापर केल्यानंतरही हे संकेतस्थळ सुरू होत नाही. https://www.krishi.maharashtra.gov.in/ हे संकेतस्थळ उघडल्यावर साईट कान्ट बी रिच असा संदेश येतो. या संकेतस्थळावर शेतकरी योजना, हवामान, नवीन नियुक्त्या, पीकपेरा अशी अनेक माहिती असते, तसेच शेतकऱ्यांना देशभरातील शेतीशी निगडीत अनेक गोष्टी येथे लिंक स्वरूपात मिळतात मात्र मागील जवळपास दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना या संकेतस्थळाबाबत अडचणी येत असून शासन त्याकडे लक्ष घालेल का? असा प्रश्न ते विचारत आहेत.












