
Meeting of ministers : सध्या रब्बीसाठी आवर्तन सुरू असून अनेक शेतकऱ्यांना आपल्या पाटाला पाणी कधी आणि कसे मिळणार याची उत्सुकता आहे. दरम्यान विदर्भ, कोकण आणि तापी पाटबंधारे विभागात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक मंत्री जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. धरणातील पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन करावे. धरणाची साठवण क्षमता, सध्याची पाणी पातळी याचा नियमित आढावा घ्यावा. पाण्याची उपलब्धता, शेतकऱ्यांची मागणी आणि पिकांच्या प्रकारानुसार विभागणी करून धरणातील पाण्याचा सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने वापर करावा अशा सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.
सिंचन क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्यासाठी अडथळा येऊ नये असे नियोजन जलसंपदा विभागाने करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रकल्पांच्या सुधारित मान्यतेचे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार पूर्व विदर्भातील गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा नदीवर बांधकामाधिन व केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत (PMKSY) अर्थ सहाय्यीत महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलढाणा अंतर्गत पाणी वापर संस्थेच्या बळकटीकरण अंतर्गत बैठका व प्रशिक्षणाकरिता सहभागृहाचे बांधकाम तसेच लघु पाटबंधारे विभाग बुलढाणा अंतर्गत कार्यालयीन इमारतीच्या दुरुस्ती व विस्तार कामाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यासाठी नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडील अन्य १३ कामांना नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडील सर्वच पदांचा आकृतीबंध त्वरित तयार करण्यात येऊन रिक्त पदांचा अनुशेष भरण्याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.