E-Panchnama App : ई-पंचनामा ॲप’ला मिळाला राज्यस्तरिय पुरस्कार..

E-Panchnama App’ : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे पीक नुकसान होत असते. या नुकसानीचा पंचनामा वेळेवर झाला नाही, तर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी खूप प्रतीक्षा करावी लागते. या पार्श्वभूमीवर नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या ‘ई-पंचनामा ॲप’ या डिजिटल प्रणालीमुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळू लागली आहे.

ही प्रणाली डिसेंबर २०२२ मध्ये विकसित करण्यास सुरुवात झाली आणि एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण झाली. पारंपरिक पंचनाम्यांना दोन ते अडीच महिने लागायचे, तर ई-पंचनामा प्रणालीमुळे हे काम आता केवळ सात दिवसांत पूर्ण होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कामात गती आली असून शेतकऱ्यांपर्यंत थेट बँक खात्यात (DBT) मदत पोहोचू लागली आहे.

या उपक्रमासाठी विभागीय आयुक्त कार्यालयास महाराष्ट्र शासनाच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान २०२३-२४’ अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपयांचे रोख पारितोषिक असून, कौशल्य, नाविन्यता व प्रशासनिक सुधारणा या घटकांवर आधारित मूल्यांकनातून हा पुरस्कार निश्चित करण्यात आला होता.

ई-पंचनामा प्रणालीद्वारे तहसीलदार, तलाठी, कृषी अधिकारी यांना नुकसानाची माहिती मोबाइलवरच नोंदवता येते. त्यात GPS लोकेशन, फोटो, पीक तपशील यासारखी माहिती संकलित होते आणि ती थेट राज्य पोर्टलवर अपडेट होते. त्यामुळे पंचनाम्याच्या पारदर्शकतेत आणि अचूकतेतही वाढ झाली आहे.

या प्रणालीचा यशस्वी प्रारंभ नागपूर विभागात झाला. त्यानंतर शासनाने राज्यभरात ‘ई-पंचनामा ॲप’ राबविण्याचा निर्णय घेतला. या डिजिटल पुढाकारामुळे प्रशासन अधिक वेगवान, उत्तरदायी आणि लोकाभिमुख झाले असून, शेतकऱ्यांच्या विश्वासाला खरी दाद मिळाल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येते.