Panchnama system : पीक नुकसानभरपाई जलद मिळण्यासाठी आता ई-पंचनामा प्रणाली…

पीक नुकसानभरपाई तातडीने मिळावी यासाठी आता राज्यात ई पंचनामा प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी होणार आहे. तशा सूचनाच मुख्यमंत्र्यांनी दिल्या असून १०० दिवसांचा कार्यक्रमही ठरवून दिला आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून पीक नुकसान मदतीचे वाटप करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडतात. यातून सावरण्यासाठी शासन मदत जाहीर करते. शासनाने जाहीर केलेली मदत त्यांना तातडीने मिळावी, यासाठी संबधित शेतकऱ्यांचे इ केवायसी प्रक्रिया तातडीने करून त्यांना थेट मदत दिली जावी. ई पंचनामा प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात यावी. त्यामुळे आता राज्यात लवकरच ई- पंचनामा पद्धत लागू होणार आहे.

अमरावती आणि नाशिकमध्ये पूनर्वसन प्राधिकरण कार्यान्वित करण्याबरोबरच अतिरिक्त ८ प्राधिकरणांसाठी मंत्री मंडळासमोर प्रस्ताव आणावा. १९७६ पूर्वी पुनर्वसन झालेल्या गावांसाठी दिलेल्या वस्तीमध्ये नागरी सुविधांची कामे पूर्ण करून ती ग्रामविकास विभागाकडे वर्ग करण्याबाबतही प्रस्ताव तयार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी यांनी सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *