गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना लागू … 

apghat yojana
जुन्या विमा योजनेनुसार अपघातग्रस्त शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते.
 राज्यात सुरू असलेली शेतकरी अपघात विमा योजना (Farmer Accident Insurance Scheme) आता बंद करण्यात आली आहे. खासगी विमा कंपनीची मदत न घेता नव्याने आता ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ बुधवारपासून (ता. १९) राज्यभर लागू करण्यात आली आहे.

जुन्या विमा योजनेनुसार अपघातग्रस्त शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. त्यासाठी स्वतः खातेदार शेतकरी तसेच त्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य म्हणजेच आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी-पती, मुलगा किंवा अविवाहित मुलगी यापैकी एक अशा एकूण दोन जणांना गेल्या पाच वर्षांपासून विमा कवच दिले जात आहे.

मात्र विमा कंपन्या तसेच विमा सल्लागार कंपन्यांकडून योजना व्यवस्थित राबविली जात नव्हती. दावे वेळेत मंजूर न करणे, उगाच त्रुटी काढून दावे नाकारण्याचे प्रकार होत असल्याचे कृषी खात्याचे म्हणणे होते. त्यामुळेच राज्य शासनाने आधीची विमा योजना बंद करून अनुदान योजना सुरू केली आहे.

नवी योजना प्रत्येक दिवसाच्या २४ तासांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेतील पात्र व्यक्तीला केव्हाही अपघात झाला तरी मदत मिळण्यास अपात्र न ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी चालू असलेल्या योजनेचा लाभ घेतल्यास नव्या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे शासनाने स्पष्ट केले आहे. शासनाने जुनी योजना बंद केल्यामुळे शेतकरी कुटुंबीयांना विमा कंपन्यांकडून होणारा जाच थांबण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नवी योजना राज्यभर बुधवारपासून (ता. १९) कार्यान्वित झाल्याचे कृषी आयुक्तालयाचे म्हणणे आहे. यापूर्वीच्या म्हणजेच ७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ दरम्यानच्या खंडित कालावधीसाठी योजनेला मान्यता दिलेली आहे.

तसेच २३ ऑगस्ट २०२२ ते १८ एप्रिल २०२३ या कालावधीसाठी मान्यता घेण्याबाबत प्रयत्न सुरू आहे. तशी शासन मान्यता मिळताच या कालावधीमधील प्रस्तावांचा विचार केला जाईल.

…या कारणांसाठी नाही मिळणार लाभ

– नैसर्गिक मृत्यू

– विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व

– आत्महत्येचा प्रयत्न किंवा आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेतल्यास

– गुन्ह्याच्या उद्देशाने झालेला अपघात

– अमली पदार्थाच्या सेवनानंतर झालेला अपघात

– भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्राव

– मोटार शर्यतीमधील अपघात

– सैन्यातील नोकरी किंवा जवळच्या लाभधारकाकडून खून झाल्यास

…या कारणांसाठी मिळणार लाभ

– रस्ता किंवा रेल्वे अपघात

– कीटकनाशके हाताळताना किंवा अन्य कारणास्तव होणारी विषबाधा

– विजेच्या धक्क्याने होणारे अपघात

– वीज पडून मृत्यू

– खून, उंचावरून पडून अपघात

– सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्यांनी केलेली हत्या

– जनावरांच्या हल्ल्यामुळे जखमी झाल्यास

– बाळांतपणातील मृत्यू

– दंगल किंवा अन्य कोणत्याही अपघातात जखमी झाल्यास

source:- agrowon

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *