Government scheme : शेतकरी व पशुपालकांसाठी दिलासादायक माहिती आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या पुढाकाराने सुरू झालेली “देशी गाई संगोपन दररोज अनुदान योजना” गोशाळांसाठी मोठा आधार ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र गोशाळांना दररोज प्रत्येकी देशी गाईसाठी ५० रुपये अनुदान दिले जाते.
ही योजना मुख्यत्वे देशी गाईंच्या संवर्धनाला चालना देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून गोशाळा चालवत असलेल्या संस्था किंवा ट्रस्ट यांना याचा थेट फायदा होणार आहे. शेतकरी आणि पशुपालकांनी गोशाळा रजिस्टर करून हा लाभ घ्यावा, असा संदेश गोसेवा आयोगाने दिला आहे.
योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही अटी आहेत. गोशाळेची नोंदणी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे झालेली असावी. संस्थेला किमान तीन वर्षांचा अनुभव असावा. तसेच गोशाळेमध्ये किमान ५० जनावरे असणे आवश्यक आहे. या सर्व गाईंना इअर टॅगिंग करून भारत पशुधन यंत्रणेमध्ये नोंदवलेले असावे. शिवाय, संस्थेकडे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
अनुदानासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने गोसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवरून करावा लागतो. अर्जासोबत गेल्या तीन वर्षांचे ऑडिट रिपोर्ट, जनावरांची नोंद आणि गोशाळेच्या व्यवस्थापनाचा तपशील द्यावा लागतो. जिल्हास्तरावर गोशाळेची तपासणी करण्यासाठी गोशाळा पडताळणी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती गोशाळेचा थेट दौरा करून अटींची पूर्तता झाली आहे की नाही, हे तपासते.
ही योजना केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर देशी गाईंच्या संगोपन, संवर्धन आणि जनजागृतीचा भागही आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालक यांना यातून नवा व्यवसायिक मार्गही सापडू शकतो. देशी गाईंपासून मिळणाऱ्या गोमूत्र, शेण, तुप यासारख्या उत्पादनांना मागणी वाढत आहे. त्यामुळे ही योजना स्वावलंबनाचा दुवा ठरू शकते.
या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी www.mahagosevaayog.org या वेबसाइटला भेट द्यावी. गावागावात गोशाळा सुरू करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि देशी गाईंच्या संवर्धनात आपला वाटा उचलावा, हीच या योजनेमागची खरी भावना आहे.












