
Farmers beware : शिराळा तालुक्यातील गिरजवडे गावाजवळील शेतशिवारात अलीकडेच एक अत्यंत आकर्षक सुरवंट आढळून आला आहे. हिरव्या, निळ्या, पिवळ्या आणि नारंगी रंगांच्या छटांनी सजलेला हा सुरवंट पाहणाऱ्यांच्या नजरा खिळवतो. मात्र, कीटकशास्त्रज्ञांच्या मते हा सुरवंट जितका सुंदर दिसतो, तितकाच तो धोकादायक आहे. याला ‘नेटल सुरवंट’ किंवा ‘स्लग मॉथ कॅटरपिलर’ म्हणून ओळखले जाते.
या सुरवंटाच्या अंगावर असलेले काटेरी केस केवळ सजावटीसाठी नसून त्यात सूक्ष्म प्रमाणात विषारी द्रव असतो. हा द्रव सुरवंट स्वतःच्या संरक्षणासाठी वापरतो. याचा स्पर्श त्वचेला झाल्यास तीव्र वेदना, जळजळ, खाज आणि काही वेळा लालसर फोड उठण्याची शक्यता असते. विशेषतः ज्यांना ऍलर्जी किंवा दम्याचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हा स्पर्श अधिक त्रासदायक ठरू शकतो.
या सुरवंटाचा प्रादुर्भाव मागील वर्षी परतीच्या पावसात काही पिकांमध्ये दिसून आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी या अळीपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे. सुरवंट माणसाच्या दिशेने येत नाही, मात्र अपघाती स्पर्श झाल्यास त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतशिवारात काम करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
सुरवंट आढळल्यास त्याच्यापासून अंतर ठेवावे. मुलांना त्याला स्पर्श करू न देण्याबाबत सावध करावे. अपघाती स्पर्श झाल्यास चिकट टेप वापरून त्वचेवरील काटे काढावेत आणि साबणाच्या पाण्याने भाग स्वच्छ धुवावा. बर्फ चोळल्याने जळजळ कमी होऊ शकते. त्रास वाढल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
शेतकऱ्यांनी या रंगीबेरंगी पण धोकादायक पाहुण्याची ओळख ठेवून आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. निसर्गातील सौंदर्य नेहमीच निरुपद्रवी नसते, हे लक्षात ठेवून सजग राहणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे.