पुसेगाव : गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मेटाकुटीला आलेल्या आले उत्पादक शेतकऱ्यांना दरातील सुधारणेमुळे दिलासा मिळत आहे. उत्पादनात झालेली घट आणि बाजारात वाढलेली मागणी यामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत आल्याला यंदा सर्वाधिक दर मिळत आहे. आले पिकाच्या (Ginger Crop) प्रतिगाडीस (५०० किलो) मालाच्या प्रतवारीनुसार ६३ ते ६५ हजार रुपये दर मिळत आहे. हा दर विक्रमी असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. बाजारात सोन्याच्या दरासोबत आले स्पर्धा करत असल्याचे चित्र आहे.
गेली चार वर्षे आले पिकाच्या दरात कायम घसरण होत होती. त्यामुळे आले उत्पादकांना सलग पाच ते सहा वर्षे मोठा आर्थिक फटका बसला. दराच्या घसरणीच्या कालावधीत शेतकरी (Farmer) चांगला नफा मिळेल या आशेने आले पिकासाठी लाखो रुपयांचा भांडवली खर्च करत होते. मात्र, बाजारात योग्य दर मिळत नसल्याने आले पीक आतबट्ट्याच ठरत होते; परंतु जानेवारी महिन्यापासून आल्याच्या दरात सुधारणार होण्यास सुरुवात झाली.
जानेवारी महिन्यात प्रतिगाडी १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत आले पिकास दर मिळाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरात सुधारणा होत गेली. आले लागवडीसाठी आले बियाणे काढणी सुरू असताना आले (धुणीच्या) दरात आणखी वाढ झाली होती. या काळात बियाण्याचे दर ३५ ते ३६ हजार रुपये प्रतिगाडीस मिळत होते. यावेळी धुणीच्या आलेचे दर २८ ते २९ हजारावर गेले होते. २१ ते ३१ मार्च या काळात आले खरेदीकडे लक्ष कमी झाल्याने आले पिकांच्या दरात घट झाली होती.
आले पिकांच्या दरातील चढ-उतार कमालीची लवचिकता असते. पुढील काळात दरात घसरण होईल, असे वातावरण झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आले विक्रीस प्राधान्य दिले होते. मात्र, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून पुन्हा दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या आले पिकास विक्रमी म्हणजे प्रतिगाडीस ६० ते ६५ हजार रुपये दर मिळत आहे. मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात गाडीमागे जवळपास दुपटीने दरात वाढ झाली आहे.
दरम्यान, एखाद्या पिकाला उच्चांकी दर मिळू लागला, की काही अनधिकृत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना वाढतात. सध्या आल्याच्या गाडीला उच्चांकी ६५ हजार रुपये दर मिळत आहे. प्रतिएकर सरासरी पंधरा ते वीस गाड्यांचा उतार धरला, तरी व्यवहाराची रक्कम जवळपास १० ते १२ लाखांच्या घरात जाते. परिणामी आले खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. त्यामुळे आले उत्पादक शेतकऱ्यांनी ज्या व्यापाऱ्यांचे बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार चोख असतील आणि जे बाजार समिती व पणन संचालनालयाचे नोंदणीकृत व्यापारी असतील अशाच खात्रीशीर व्यापाऱ्यांना आल्याची विक्री करणे आवश्यक आहे.
जेणेकरून संभाव्य फसवणूक टाळली जाईल. सध्या उच्च दर्जाच्या आल्याची परदेशात मागणी वाढली आहे. मागच्या वर्षी भारतातून मसाल्याची जेवढी निर्यात झाली, त्यात आल्याचा समावेश जास्त होता. आल्यापासून तयार होणारी सुंठदेखील बाजारात रुबाब दाखवत आहे. देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांतील बाजारपेठांमध्ये आल्याची मागणी कायम आहे. त्यामुळे भविष्यात देखील आले शेती आणखी फायदेशीर ठरेल, असे आले व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे
तब्बल दहा वर्षांनी विक्रमी दर
आले पिकास २०१२ नंतर प्रथमच आल्याच्या दराने यंदा ६० हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यानंतर काही काळ दर टिकून होते. कोरोनाच्या संसर्गापासून मात्र दरात मोठी घसरण होत गेली. या काळात नीचांकी चार ते पाच हजार रुपये दर मिळाला होता. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हे पीक बंद केले होते. मात्र, यावर्षी जानेवारी महिन्यापासून दरात सुधारणा होत गेली. तब्बल दहा वर्षांनंतर आल्याने ६० हजार रुपये विक्रम मोडीत काढला आहे. सध्या प्रतिगाडीस ६३ ते ६५ हजार रुपये दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
source:- esakal