Govt job : सरकारी नोकरीची आनंद वार्ता: राज्यात या विभागात होणार मेगाभरती..

Govt job : मृद व जलसंधारण विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी आणि कार्यरत असणाऱ्या यंत्रणेला बळकटी देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभागाने नव्याने एक आकृतिबंध तयार करून तो वित्त विभागाकडे पाठवला होता. या प्रस्तावानुसार, ८६६७ पदांना वित्त विभागाने मान्यता दिली असून, ही पद भरती लवकरच केली जाईल, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री राठोड म्हणाले की, २०१७ साली या विभागाला स्वतंत्र मान्यता दिल्यानंतर १६,४२३ पदांचा आकृतिबंध तयार करण्यात आला होता. ही पदे जलसंपदा व कृषी विभागाकडून वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप ती पदे मृद व जलसंधारण विभागाला मिळालेली नाहीत, अशी माहिती मंत्री राठोड यांनी दिली.

राज्यातील बदलत्या हवामान परिस्थिती, भूजल पातळीतील घसरण, व लोकाभिमुख पाणलोट व्यवस्थापन यासाठी फिल्डवर काम करणारी सशक्त यंत्रणा आवश्यक असल्याचे मंत्री राठोड यांनी स्पष्ट केले.