
Good News Turmeric:- हळद शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज असून राष्ट्रीय हळद मंडळाची देशात स्थापना झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रीय हळद मंडळाचे उद्घाटन केले. त्यांनी मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून पल्ले गंगा रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली. मंडळाचे मुख्यालय निजामाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे.
मंडळाच्या अध्यक्षांव्यतिरिक्त, आयुष मंत्रालय, औषधनिर्मिती विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आणि वाणिज्य विभागाचे प्रतिनिधी देखील नामनिर्देशित करण्यात आले. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन प्रमुख हळद उत्पादक राज्यांचे तसेच लकाडोंग हळदीसाठी प्रसिद्ध असलेल्या मेघालय राज्याचे प्रतिनिधी देखील मंडळाचा भाग असतील.
राष्ट्रीय हळद मंडळ हळद क्षेत्राशी संबंधित बाबींमध्ये इतर सरकारी विभाग/संस्थांशी समन्वय साधेल आणि देशातील हळद क्षेत्राची वाढ आणि विकास सुलभ करण्याचे काम करणार आहे.
भारतीय हळद आणि निर्यातीत वाटा :
हळदीच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा 70% पेक्षा जास्त आहे. भारतात हळदीच्या 30 वाणांचे उत्पादन घेतले जाते. भारत हा हळदीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि निर्यातदार आहे. 2023-24 मध्ये, 226.5 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स मूल्याची 1.62 लाख टन हळद आणि हळदीच्या उत्पादनांची निर्यात झाली.
हळद मंडळामुळे असे होणार लाभ:
१. नव्याने स्थापन झालेले मंडळ महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, मेघालय यासह 20 राज्यांमधील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष देईल. २. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हळद उत्पादन वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे आणि हळद मंडळाच्या स्थापनेमुळे देशातील हळद उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ होईल.
३. मंडळ नवीन हळद उत्पादनांच्या संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देईल आणि परदेशात विपणनासाठी हळदीशी संबंधित उत्पादनांच्या मूल्यवर्धनाकडे लक्ष देईल.
४. हळदीचे महत्वपूर्ण आणि वैद्यकीय गुणधर्म, त्याचे उत्पादन वाढवण्याच्या पद्धती आणि नवीन बाजारपेठांमध्ये व्यापाराला चालना देण्यासाठी लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळीला चालना देण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याबाबत मंडळ विचार करेल.
५. तसेच हे मंडळ हळदीचे उत्पादन आणि निर्यातीची गुणवत्ता आणि सुरक्षा मानके देखील सुनिश्चित करेल.