नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ८४ ग्रामपंचायतींमधील विविध कारणांनी रिक्त झालेल्या १११ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने निर्गमित केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ८४ ग्रामपंचायतींमधील विविध कारणांनी रिक्त झालेल्या १११ सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाने निर्गमित केला आहे. त्यानुसार येत्या २५ एप्रिलपासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्राम पंचायतीतील सदस्य, थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणूकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने तसे आदेश जिल्हा निवडणूक विभागाला दिले आहेत. त्यानुसार प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम ठरविण्यात आला आहे.
येत्या २५ एप्रिलपासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेस सुरवात होईल. त्यात २५ एप्रिल ते २ मे उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती, ३ मे अर्जांची छाननी, ८ मेस माघारी व निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.
तर १८ मेस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
तसेच, २४ मेस जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ८४ ग्रामपंचायतींमधील एकूण १११ जागांचा समावेश आहे. त्यासंबंधीचे सूचना व आदेश तहसिलदारांना देण्यात आले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात थेट सरपंच निवड प्रक्रियेतील एकही सरपंचपदाची जागा रिक्त नाही. केवळ १११ जागा या ग्रामपंचायत सदस्यांच्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक सदस्यपदासाठी होणार आहे.
source:-agrowon