
पानी फाऊंडेशन गट शेतीची सुरूवात कोविड आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या विचाराने करण्यात आली होती व या गट शेतीला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.पानी फाऊंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांनी सांगितले की ,आता काही तालुक्यांपर्यंत मर्यादित असलेले हे गट शेतीचे काम येत्या दोन वर्षात संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.
गुरूवारी पानी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित केलेला ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२३’ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला . त्यावेळी आमिर खान बोलत होते. पानी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव, सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते.
आमिर खान म्हणाले, २०१६ मध्ये पानी फाऊंडेशनची सुरूवात झाली होती. प्रथम जल संधारणावर चार वर्षे आम्ही काम केले. या कामाची सुरुवात तीन तालुक्यांपासून सुरु झाली होती ते काम आता ७५ तालुक्यांपर्यंत पोहचले आहे. याकाळामध्ये महाराष्ट्रातील गावांनी जल संधारणाच्या कामातून जगात काही अशक्य नाही हे दाखवून दिले.आता संपूर्ण महाराष्ट्रात जाण्याचे ध्येय फाउंडेशनने ठेवले आहे , गट शेतीच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना – उद्योजक घडवायचे आहे असे अमीर खान यावेळी म्हणाले.
केवळ एकीच्या माध्यमातून गट शेतीचा प्रयोग यशस्वी करणे शक्य असल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले. शेतकरी हा बळीराजा अन्नदाता असून तसेच तो एक व्यावसायिक आहे. जागतिक पातळीवर आता आपली ही स्पर्धा असून,आपण ही स्पर्धा गट शेतीच्या माध्यमातून जिंकू शकतो असेही विलास शिंदे म्हणाले.
या स्पर्धेमध्ये राज्यामधील अठरा जिल्ह्यांतील ३९ तालुक्यांमधील ३००० गटांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार सोलापूर येथील कुंभारगाव ऍग्रो प्रोड्यूसर कंपनी यांना देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पृहा जोशी आणि जितेंद्र जोशी यांनी केले. कार्यक्रमास अभिनेते जॅकी श्रॉफ,आदिनाथ कोठारे अतुल कुलकर्णी,पुष्कर श्रोत्री, प्रकाश राज, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर उपस्थित होते.
महिलांचा सहभाग आनंददायक : देवेंद्र फडणवीस
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे त्यांनी व्हिडिओ संदेश पाठवून फार्मर कपला शुभेच्छा दिल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवण्यात येतात . आता सरकारी योजनांना फार्मर कापच्या निमित्ताने चळवळीचे रूप आले असून यामध्ये महिलांचा सहभाग खूप लक्षणीय आहे याचा मला आनंद होत आहे . फाउंडेशनने महिलांसाठी विशेष पुरस्कार ठेवले आहेत ही कौतुकाची बाब आहे.असेही यावेळी ते म्हणाले .