
Heat stress : गेल्या २४ तासांमध्ये देशात उष्णतेची लाट काही भागांत तीव्र झाली असून, महाराष्ट्रातही उन्हाचा चटका जाणवत आहे. विदर्भात उष्णतेची लाट सुरू असून चंद्रपूर येथे काल देशात सर्वाधिक तापमान म्हणजेच ४४.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले. त्याचवेळी महाराष्ट्रात सर्वात कमी तापमान महाबळेश्वर किंवा कोकण भागात राहिले, जिथे तापमान तुलनेने सौम्य होते.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ४० अंशाच्या आसपास होते. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा शहरांमध्ये कमाल तापमान ३९ ते ४२ अंशांच्या दरम्यान राहिले. त्यामुळे दिवसादरम्यान उन्हाचा तीव्र त्रास जाणवतो आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामान बदलाचा विचार करून योग्य काळजी घ्यावी, घराबाहेर पडताना डोके झाकून ठेवावे, हलके आणि सुती कपडे वापरावेत, तसेच भरपूर पाणी प्यावे, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
दरम्यान गेल्या २४ तासांत देशात काही ठिकाणी हलक्याफुलक्या सरी कोसळल्या. कर्नाटकातील दक्षिण भागात, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, आसाम, मेघालय, अंडमान-निकोबार आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडल्या. अंडमानमध्ये कार निकोबार येथे ६ सें.मी. पावसाची नोंद झाली.
पुढील तीन ते चार दिवस देशाच्या विविध भागांमध्ये हवामानात बदल होणार आहे. उत्तर भारतात, विशेषतः जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. पूर्व भारतात आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विदर्भात २३ एप्रिलपर्यंत ही उष्णता कायम राहण्याचा अंदाज आहे.
या हवामानाच्या बदलामागे पश्चिम विक्षोभ, पाकिस्तान व राजस्थानवरील सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि देशाच्या मध्य-पूर्व भागांतील हवामान तळातील दबावरेषा कारणीभूत आहेत. त्यामुळेच काही भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस तर काही भागांत उष्णतेचा जोर जाणवतो आहे.