
Rain update : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून, कोकण व घाटमाथ्यावरील भागांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील काही दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार सरींचा अंदाज असून, घाटमाथ्यावरील भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पालघर, ठाणे आणि मुंबईतही मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा जोर कायम असून, नांदेड, जालना, परभणी, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूरच्या सिंदेवाही भागात गेल्या २४ तासांत तब्बल १११ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर नागपूरमध्ये ३२.८ अंश सेल्सिअस तापमानासह उष्णतेचा उच्चांक नोंदवला गेला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून आणखी सक्रिय होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस काही प्रमाणात दिलासा देणारा असला, तरी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः झेंडू, ऊस, केळी यांसारख्या पिकांना आधार देणे, यंत्रसामग्री सुरक्षित ठेवणे आणि फवारणी टाळणे गरजेचे आहे.
राज्यभरात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले असून, पुढील २४ तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण व घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहणार असल्याने पुढील काही दिवस हवामानात मोठे चढ-उतार दिसून येण्याची शक्यता आहे