
Akshaya Tritiya 2025 : आज अक्षय्य तृतीयेच्या सणानिमित्त म्हणजेच दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी राज्यातील पाणीसाठा किती आहे, ते जाणून घेऊ. राज्य सरकारकडून उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार आज ३० एप्रिल रोजी सकाळी सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा ३४.७७ टक्के इतका असून उपयुक्त साठा केवळ २९.२० टक्क्यांवर आहे. मागील वर्षी याच दिवशी उपयुक्त साठा ३०.६५ टक्के होता. त्यामुळे यंदा साठ्यात किंचित घट झाली आहे.
मोठ्या प्रकल्पांमध्ये ३३.५२ टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये ४१.७७ टक्के आणि लघु प्रकल्पांमध्ये ३४.४१ टक्के इतका एकूण पाणीसाठा शिल्लक आहे. यातील उपयुक्त साठा अनुक्रमे २७.७६, ४२.४८ आणि ३३.८६ टक्के आहे.
विभागनिहाय विचार केला असता नागपूर विभागात सध्या ३६.६१ टक्के उपयुक्त साठा असून, तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. अमरावती विभागात ४५.२५ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ३४.४८ टक्के, नाशिकमध्ये ३८.९५ टक्के, पुण्यात २८.३२ टक्के आणि कोकणात ४२.२० टक्के उपयुक्त साठा आहे. काही विभागांमध्ये मागील वर्षीपेक्षा स्थिती सुधारली असली तरी पुणे आणि नागपूरमध्ये साठा कमी आहे.
गोसीखुर्द धरणात १९.७५ टक्के साठा असून, तो मागील वर्षाच्या तुलनेत घटलेला आहे. काटेपूर्णा धरणात २४.३१ टक्के पाणी आहे. जायकवाडी (पैठण) धरणात ४०.३३ टक्के साठा असून मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विष्णुपुरीमध्ये ५४.३७ टक्के, माजलगावमध्ये १५.१६ टक्के, तर भंडारदरा धरणात ५६.२८ टक्के पाणीसाठा आहे.
निळवंडे, गंगापूर, गिरणा, दारणा, राधानगरी, खडकवासला, पवना, पानशेत, नीरा देवघर, वारणा, कोयना व वीर या धरणांमध्ये साठा सरासरी २० ते ५५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. यातील काही धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत थोडी सुधारणा दिसून येते, तर काही ठिकाणी घटही नोंदली गेली आहे.
राज्यातील एकूण जलसाठा पाहता, पाणीटंचाई टाळण्यासाठी येत्या काळात नियोजनबद्ध जलव्यवस्थापन अत्यावश्यक ठरणार आहे. पावसाळ्यापूर्वी जलसाठ्याची ही स्थिती प्रशासनासाठी सतर्कतेचा इशारा ठरू शकते.