Dam water storage: राज्यातील धरणात आजपर्यंत किती पाणीसाठा? कुठली धरणे ओव्हर फ्लो…

Dam water

Dam water  storage : महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात पावसामुळे चांगली भर पडली असून, २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतची जलसंपदा विभागाची आकडेवारी पाहता अनेक मोठ्या धरणांमध्ये ७० ते ९० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला आहे. काही ठिकाणी धरण ओव्हरफ्लोही झाले आहेत.

उत्तर अहमदनगरमधील भंडारदरा धरण ७८ टक्के भरले असून, ८३५ क्युसेक्सने प्रवरा नदीत विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरणात ८७ टक्के साठा असून, ९०० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आढळा धरण १०० टक्के भरल्याने ओव्हरफ्लो आहे. मुळा धरण सुमारे ७५ टक्के भरले असून, कालव्याद्वारे पाणी सोडले जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील गंगापुर आणि दारणा धरणांत अनुक्रमे ६२ व ८३ टक्के साठा असून, दारणामधून २४१६ क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. नांदुरमधमेश्वर प्रकल्पातून गोदावरी नदीत १६१४ क्युसेक्सने विसर्ग सुरू असून, कालव्यांमधून २७१८ क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण ५६ टक्के भरले आहे. हतनूर धरण २९ टक्के भरले असून, त्यातून १०,७३० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. वाघूर धरणातही पाणीसाठा ६५ टक्क्यांच्या आसपास आहे.

पुणे विभागात पानशेत, मुळशी, पवना, वीर, भाटघर, चासकमान या सर्वच धरणांत ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असून, मुळशी धरणातून २५०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना धरणात ७४ टक्के पाणीसाठा असून, विसर्ग २१०० क्युसेक्सने सुरू आहे. कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून ४१७५० क्युसेक्स विसर्ग नोंदविण्यात आला आहे.

मराठवाड्यातील जायकवाडी धरण ८४ टक्के भरले असून, कालव्याद्वारे २१०० क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. इतर धरणांमध्ये सुद्धा सरासरी ५० ते ७० टक्के साठा आहे.

गोसीखुर्द धरण (भंडारा) २२ टक्के भरले असून, यामधून सध्या ८४,९६८ क्युसेक्स पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. नागपूर, अमरावतीतील काही धरणांमध्ये साठा तुलनेने कमी आहे.

कोकणातील भातसा, वैतरणा, सुर्या, तिलारी यामध्ये ८० ते ९० टक्के पाणीसाठा असून, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग भागात पावसामुळे नवीन आवकही चांगली आहे. भातसा धरणातून ३९६० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

सध्या भंडारदरा, कोयना, महाबळेश्वर, नवजा अशा काही ठिकाणी ५० मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यामुळे नदीपात्रात आणि सखल भागांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते.