Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आरक्षणासाठी उपोषण तीव्र, सरकारकडून प्रस्तावाची तयारी..

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : 📌 राजकीय हालचालींना वेग मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. काल (३१ ऑगस्ट) रात्री उशिरा झालेल्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. या बैठकीत आरक्षणाच्या कायदेशीर अडचणी आणि संभाव्य तोडग्यांवर विचारमंथन होणार आहे.

📌 उपमुख्यमंत्र्यांची तातडीची उपस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील मूळगावी असताना तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. या हालचालींमुळे सरकारच्या गांभीर्याची स्पष्ट झलक मिळते. आजच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती निश्चित असून, निर्णायक निर्णय होण्याची शक्यता आहे.

📌 मनोज जरांगे यांना प्रस्ताव जाण्याची शक्यता सरकारकडून आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांना आज अधिकृत प्रस्ताव पाठवला जाऊ शकतो. मात्र, मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून संबोधण्यास न्यायालयीन अडसर असल्यामुळे, सरकारने कायदेशीर सल्लामसलतीसाठी महाधिवक्त्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. जरांगे यांच्या मागण्या स्पष्ट असून, त्यावर सरकारकडून तोडगा सुचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

📌 मंत्रालय परिसरात कडेकोट बंदोबस्त मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वर्किंग डे असल्यामुळे कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या मुंबईकरांची तपासणी करूनच प्रवेश दिला जात आहे. आयकार्ड नसलेल्या व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात येत असून, सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक बॅगची तपासणी केली जात आहे.

📌 जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी पुढील मागण्या मांडल्या आहेत:

  • मराठा कुणबी एक आहेत, याची अंमलबजावणी झाली पाहिजे

  • हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करावेत

  • कुणबी नोंद असलेल्या व्यक्तींच्या सगे-सोयर्‍यांना पोटजात मानावे

  • आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत

  • कायद्यात बसणारे आरक्षण द्यावे