Dam water storage : मॉन्सून लांबला तर राज्यातील धरणांमध्ये किती पाणी शिल्लक…

Dam water storage : यंदा मॉन्सून वेळेआधी राज्यात आला, तरी त्यात खंड पडून तो १३ ते १५ जूननंतर सकीय होऊ शकतो असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे. ९ जून २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व जलप्रकल्पांमध्ये साचलेल्या एकूण पाणीसाठ्याचा विचार करता, राज्यभरात सरासरी ३०.५० टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे. यापैकी उपयुक्त साठा १२,३५१.७६ दशलक्ष घनमीटर इतका असून तो एकूण क्षमतेच्या २५.६ टक्के इतका आहे. गेल्या वर्षी याच तारखेला उपयुक्त पाणीसाठा १९,९६०.७६ दशलक्ष घनमीटर होता, जो यावर्षीपेक्षा सुमारे ८ टक्के कमी होता.

राज्यातील मोठ्या प्रकल्पांचा विचार करता, त्यात सध्या २८.६४ टक्के पाणीसाठा असून उपयुक्त साठा ८,३२३.६० दशलक्ष घनमीटर आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये ३९.७८ टक्के तर लघुप्रकल्पांमध्ये ३१.०२ टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. या टक्केवारीतून दिसते की, मध्यम प्रकल्पांमध्ये तुलनेने अधिक पाणीसाठा आहे, तर लघुप्रकल्प आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये पुरेसा साठा नाही.

विभागानुसार साठ्याचा आढावा घेतला असता, नागपूर विभागात एकूण साठा ३२.६१ टक्के असून त्यापैकी उपयुक्त साठा १,५०२.१७ दशलक्ष घनमीटर आहे. अमरावती विभागात ३९.५० टक्के साठा आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास सारखाच आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात साठा २९.९८ टक्के आहे, परंतु गेल्यावर्षी तो फक्त ९.५५ टक्के होता. नाशिक विभागात साठा ३१.९७ टक्के असून, पुणे विभागात साठा सर्वात कमी म्हणजे २६.५३ टक्के आहे. कोकण विभागात मात्र तुलनेने चांगला साठा म्हणजे ३३.६५ टक्के उपलब्ध आहे.

प्रमुख धरणांची स्थिती पाहता, उजनी धरणात सध्या ३४.९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गोसीखुर्द धरणात १७.७४ टक्के साठा असून मागील वर्षीपेक्षा हा साठा कमी आहे. काटेपूर्णा धरणात फक्त १५.४३ टक्के साठा आहे. पैठण म्हणजे जायकवाडी धरणात २९.४९ टक्के साठा आहे जो मागच्या वर्षीपेक्षा जास्त आहे. विष्णुपुरी धरणाचा साठा ४९.८७ टक्के असून तो तुलनेत चांगला आहे. माजलगाव धरण फक्त ११.२१ टक्क्यावर आहे, तर भंडारदरा धरणाचा साठा १९.७७ टक्के आहे.

निळवंडे, गंगापूर, गिरणा आणि दारणा या नाशिक विभागातील धरणांमध्ये अनुक्रमे २९.२५, ४४.४१, २१.३८ आणि ३५.५८ टक्के उपयुक्त साठा आहे. पुणे विभागातील राधानगरी धरण ४९.१० टक्के भरले आहे, तर खडकवासला आणि पवना अनुक्रमे ४२.३४ आणि २५.८६ टक्के भरले आहेत. पानशेतमध्ये फक्त १५.२० टक्के साठा आहे. नीरा देवघरमध्ये ९.६९, तर कोयना धरणात १७.३४ टक्के साठा आहे. वीर धरणात मात्र ४२.५९ टक्के पाणी असून हे समाधानकारक म्हणावे लागेल.