Weather update : राज्यात काही भागात मॉन्सून लवकरच सक्रीय होण्याची चिन्हे..

weather update : महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल हळूहळू पुढे सरकत असून ९ जून रोजी मिळालेल्या हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे, मान्सून सध्या मुंबई, अहल्यानगर, आदिलाबाद, भुवनेश्वर आणि पुरी या मार्गाने सरकतो आहे. खान्देश, नाशिक व विदर्भातील व उत्तरेकडील जिल्ह्यात अजून मान्सून पोहोचलेला नाही. कोकण आणि मुंबई परिसरात मान्सून पोहोचला असून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील इतर भागांत लवकरच सक्रिय होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत कोकण, गोवा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे.

देशपातळीवर मान्सूनची स्थिती पाहता, ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा याठिकाणी सातत्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी येत आहेत. केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्येही पावसाची स्थिती सुधारते आहे. परंतु उत्तर भारतात राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश याठिकाणी अद्याप उष्णतेच्या लाटांचे प्रमाण कायम आहे. श्रीगंगानगर (राजस्थान) येथे कमाल तापमान ४७.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. यामुळे मान्सूनचा वेग काहीसा मंदावल्याचे जाणवते.

महाराष्ट्र राज्यासाठी ९ ते १३ जून दरम्यानचा पाच दिवसांचा हवामान अंदाज पुढीलप्रमाणे आहे. कोकण आणि गोवा भागात १२ जूनपासून जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १३ आणि १४ जून रोजी कोकण आणि गोवा तसेच किनारपट्टी भागात अतिवृष्टीचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्रात ११ जूनपासून हलक्या सरी अपेक्षित असून १३ आणि १४ जून रोजी काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. मराठवाड्यातही १३ आणि १४ जूनला पावसाची शक्यता असून यामुळे शेतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल.

विदर्भात ११ आणि १२ जूनला विजांसह वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. काही भागांत ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. ही स्थिती केळी, पपई, मका यांसारख्या पिकांवर परिणाम करू शकते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पीक संरक्षणाची तयारी ठेवावी.

एकंदरीत, मान्सून हळूहळू राज्यात सक्रिय होत असून कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पुणे विभागात पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे, खत आणि मशागत यासंबंधीची तयारी पूर्ण ठेवावी. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सतत माहितीवर लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे.