अनोखी चव, गंध, रंग, आकार, उत्पादकता या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण पेटंट संत्रा वाण ‘टँगो’ भारतात आयात करण्यात आले आहे. याला शेतकऱ्यांकडून व ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे ,यामुळे आता राज्यातील लिंबू वर्गीय शेतीमध्ये नक्कीच बदल होणार आहे . या वाणांची आयात ‘सह्याद्री फार्म्स’ या शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रयत्नांतून करण्यात आली आहे. त्यावर सध्या क्वारंटाईन प्रक्रिया सुरु आहे.
या आधी द्राक्षांचे पेटंट वाण सह्याद्री फार्म्सने यशस्वीरित्या भारतात आणले आहेत.त्यानंतर ‘टँगो‘ हे संत्रा वाण आणले आहे. भारतीय फलोत्पादनामधील ही महत्वपूर्ण घटना आहे . यामुळे आता लिंबूवर्गीय फळ उत्पादकांचे आर्थिक उत्पन्न आणि उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे . जागतिक स्तरावरील अग्रगण्य वाण टँगो हे संत्रा वाण कॅलिफोर्निया विद्यापीठाने विकसित केले आहे . कृषी क्षेत्रात नावीन्यपूर्ण असलेल्या युरोसेमिलास या कंपनीकडे या वाणाचे जागतिक परवाना अधिकार आहेत.
काय आहेत वाणाची वैशिष्ट्ये..
◼️ टँगो संत्रा सोलण्यास सोपे व मध्यम आकाराचे फळ आहे.
◼️ त्याला एक अनोखी चव आहे संतुलित आम्ल-साखर गुणोत्तर व पुरेपूर रसाळपणा यामध्ये आहे .
◼️ टँगोमध्ये जवळजवळ बिया नाहीत . हेच त्याचे खास वैशिष्ट्य आहे . २५ फळांमध्ये फक्त ०.२ बिया आढळतात
◼️ त्याचा आकार, रंग, चव, गोडीचे प्रमाण आणि सोलणे सोपे या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे हे वाण विशेष आहे.
◼️ या वाणामध्ये जवळच्या इतर कोणत्याही वनस्पतीतील विरोधी परागीकरणाची भीती अजिबात नसते . हेक्टरी ६० टन इतकी उच्च उत्पादकता आहे .
◼️ याची विविध गुणधर्मामुळे या संत्र्याला बाजारात विक्री चांगली राहील. या वाणाला ग्राहकांकडून मोठी मागणी आहे.
फायदेशीर व शाश्वत शेतीसाठी…
‘सह्याद्री फार्म्स‘ या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविलेल्या शेतकऱ्यांच्या कंपनीची मुख्य भूमिका शेती व्यवसाय हा व्यवसाय छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यासाठी फायदेशीर व शाश्वत स्वरुपाचा व्हावा, अशी आहे. या कंपनीच्या पुढाकारातून जगभरातील दर्जेदार पेटंट द्राक्ष वाण आपल्या सभासद शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले आहेत. सामान्य शेतकऱ्यांचे अर्थकारण त्यातून बदलले आहे. ‘सह्याद्री फार्म्स’च्या शेतकऱ्यांसाची गुणवत्तेच्या द्राक्ष उत्पादनावर आधारित जागतिक स्तरावर विशेष ओळख यातून निर्माण झाली आहे.‘सह्याद्री फार्म्स’ने नव्या पेटंट द्राक्ष वाणांच्या वाढीचे व वितरणाचे अधिकारही प्राप्त केले आहेत.शेतकऱ्यांमध्ये विविध वाणांच्या यशस्वी हाताळणीमुळे आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर‘‘टँगो वाणामुळे त्याचा ठळक प्रभाव पडणार आहे. महाराष्ट्र राज्य हे लिंबूवर्गीय उत्पादनात आघाडीवर असून याच पिकातील क्रांतीचा साक्षीदार होईल. भारतातील सध्याच्या संत्र्याच्या वाणाला जागतिक बाजारपेठेमध्ये मर्यादित वाव होता परंतु आता या नवीन वाणामुळे संधीची दारे खुली होण्यास मदत होईल असा विश्वास आहे.‘‘
– विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सह्याद्री फार्म्स,मोहाडी,जिल्हा नाशिक