Caring for orchards : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मोसम सेवा योजनेतर्गत तज्ञ समितीने शेतकऱ्यांना हवामानानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शनपर सल्ला दिला आहे.
पीक व्यवस्थापन
सध्या वातावरणात बदल होत असल्याने ऊस, हळद व तीळ यांसारख्या पिकांमध्ये योग्य काळजी घेण्याची गरज आहे.
ऊस पिकासाठी आवश्यकतेनुसार पाणी द्यावे, तसेच खुरपणी करून तण नियंत्रण करावे. खोड किडीचा प्रादुर्भाव दिसल्यास क्लोरपायरीफॉस 20% (25 मि.ली.) किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% (4 मि.ली.) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 30% (36 मि.ली.) प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हळद पिकाची काढणी करावी व उकडणे, वाळवणे ही कामे पावसाचा अंदाज पाहून करावीत. हळदीची सुरक्षित साठवणूकही महत्त्वाची आहे.
उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. शक्य असल्यास तूषार सिंचनाचा अवलंब करावा.
फळबाग व्यवस्थापन:
मृग बहारातील संत्रा व मोसंबी फळांची काढणी करून पावसापूर्वी विक्रीस आणावी. अंबे बहार बागेत झिंक व 00:52:34 खतांची फवारणी पावसाची उघड बघून करावी.
वादळ व पावसामुळे पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत आणि मोडलेल्या फांद्या कापाव्यात. लहान फळझाडांना आधार देणे आवश्यक आहे.
डाळिंब व चिकू बागेतही वेळच्या वेळी पाणी देणे व काढणी केलेल्या फळांची योग्य साठवणूक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेवटी, हवामानातील बदल लक्षात घेता, शेतकऱ्यांनी शेतीतील निर्णय काळजीपूर्वक व तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार घ्यावेत, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.












