
Agriculture Minister : केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे राज्य असलेल्या मध्यप्रदेशात मागील काही दिवसांपासून कांद्याची घसरण सुरू असून आता येथील दर केवळ १ रुपयांवर आलेले आहेत. महाराष्ट्रातील कांदा बाजाराभाव वाढत असताना मध्यप्रदेशात मात्र कांदा दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सध्या मध्यप्रदेशातील बाजारांत कांद्याला सरासरी ५५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहे, तर महाराष्ट्रात हाच दर सरासरी ११०० रुपये प्रति क्विंटल इतका आहे.
दरम्यान बाजार रिर्पोर्टनुसार मध्य प्रदेशातील नीमच येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याचे दर प्रचंड घसरले असून, कांदा फक्त १ ते १.१० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. उत्पादनाचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिकच गंभीर झाली आहे.
या हंगामात मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली आहे. मात्र मागणी कमी असल्यामुळे बाजारात कांद्याचे दर ढासळले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नाही. बाजारात जाऊन कांदा विकण्याचा खर्चही भरून निघत नसल्यामुळे काही शेतकरी कांदा विकण्याऐवजी तो जनावरांना खाऊ घालण्याचा विचार करत आहेत.
नीमच मंडी प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला आहे की, ते आपला कांदा काही काळ साठवून ठेवावा आणि दर वाढण्याची वाट पहावी. मात्र सर्व शेतकऱ्यांकडे साठवणूक करण्याची सुविधा नाही, त्यामुळे त्यांना तात्काळ विक्री करावी लागते आणि तोट्यात काढावे लागते.
या स्थितीमुळे शेतकरी सरकारकडे किमान समर्थन मूल्य (MSP) लागू करण्याची आणि आर्थिक मदतीची मागणी करत आहेत. कांद्याच्या दरातील ही अनपेक्षित घसरण शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम करत असून, तातडीने उपाययोजना न झाल्यास त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.