India-Russia : भारत-रशिया व्यापारात वाढ निर्यातदारांना दिलासा..

India-Russia : अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापारी तणावाने जागतिक स्तरावर नवे समीकरण निर्माण केले आहे, आणि या पार्श्वभूमीवर रशियाने भारताच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संकेत दिला आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या प्रशासनाला भारताकडून शेतीमाल आणि औषधांची आयात वाढवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अमेरिकेने भारतीय निर्यातीवर लादलेल्या उच्च आयात शुल्कामुळे कापड, कोळंबी, फळे, भाजीपाला, सोयापेंड यांसारख्या क्षेत्रातील निर्यातदार अडचणीत आले आहेत, अशा वेळी रशियाचा हा निर्णय भारतीय निर्यातदारांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर दबाव आणण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याची अट घातली आणि अमेरिकन शेतीमालासाठी बाजारपेठ खुली करण्याची मागणी केली. मात्र भारताने ही मागणी नाकारत स्वाभिमान टिकवला, परिणामी अमेरिकेने ५० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क तसेच २५ टक्के दंडात्मक शुल्क लादले. तरीही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवत आपली स्वायत्त भूमिका कायम ठेवली.

वालदाई डिस्कशन क्लबमध्ये बोलताना पुतीन यांनी भारताच्या भूमिकेचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “समतोल साधणारे, बुद्धिमान आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारे नेता” असे संबोधत त्यांनी भारत-रशिया नात्यातील दृढतेवर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे भारताचे झालेले नुकसान रशियाकडून वाढलेल्या व्यापारामुळे भरून निघेल. सध्या भारतातून रशियाला तांदूळ, मासे, कोळंबी, द्राक्षे, चहा, कॉफी, तंबाखू यांसह औषधे, रसायने, पोलाद, यंत्रसामग्री, काच, कपडे, चामडे, रबर वस्तू आणि शस्त्रक्रिया उपकरणे यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. रशियाच्या या नव्या निर्णयामुळे भारताच्या या उत्पादनांना स्थिर बाजारपेठ मिळण्याची अपेक्षा आहे.