FPO Success story : नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढाकारातून एकत्रित येत स्थापन झालेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्यसर कंपनीच्या मालकीची उपकंपनी असलेल्या सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लि. या कंपनीमध्ये रिसपॉन्सअबिलीटी (युरोप) व जीईएफ (अमेरिका) यांनी रू.३९० कोटींची गुंतवणूक केली आहे.
त्यांच्या समवेत एफ.एम.ओ(FMO), प्रोपॅर्को, इन्कोफिन आणि कोरीस या सध्याच्या गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. या गुंतवणूकीचा उपयोग पेटंटेड द्राक्षे आणि लिंबूवर्गीय फळांच्या जातींच्या लागवड क्षेत्र विस्तारासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या क्षमतेत वाढ व मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीसाठी करण्यात येईल.
सह्याद्री फार्म्स फळे आणि भाजीपाल्याच्या पुरवठा साखळीमध्ये कार्यरत आहे. प्रामुख्याने दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन करणे, प्राथमिक प्रक्रिया तसेच इतर मूल्यवर्धन करून उत्पादने प्रमुख आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करण्याचे कार्य सह्याद्री फार्म्समध्ये केले जाते. जवळपास, २५००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून उत्पादने घेतली जातात.
या कंपनीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रक्रिया सुविधांमुळे टेस्को, एडेका, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि कोका-कोला यांसारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची उत्पादने पुरवली जातात.
बदलत्या व लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असते.
अनेक फळांमधील जुनी वाणे ही बदलत्या हवामानात आता तग धरू शकत नाही. तसेच ग्राहकांच्याही आवडी-निवडी बदलल्या आहेत. हे लक्षात घेऊन सह्याद्री फार्म्सने द्राक्ष व लिंबुवर्गीय पीकांच्या नवीन वाणांची आयात केली. याकरीता ग्रापा, ब्लूमफ्रेश, ITUM आणि यूरोसेमिलास यांसारख्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय वाण निर्मिती करणाऱ्या कंपन्यासोबत भागीदारी केली आहे.
यामुळे देशाच्या फलोत्पादन क्षेत्राला लाभ होईल व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपल्या उत्पादनांचा हिस्सा वाढविण्यास मदत होणार आहे. शेती क्षेत्रातील महिलांचे लक्षणीय योगदान लक्षात घेऊन सह्याद्री फार्म्समध्ये सर्वच पातळ्यांवर महिलांचा सक्रिय सहभाग घेण्यावर भर देण्यात येत आहे.
सन २०१० मध्ये विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही मोजके द्राक्ष उत्पादक एकत्रित आले. सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून द्राक्ष निर्यातीचे काम सुरू केले. पुढच्या टप्प्यावर या कंपनीने इतर फळपीकांमध्ये तसेच प्रक्रिया उत्पादनांवर काम करून जगाच्या विविध बाजारपेठेत आपली ओळख निश्चित केली. आज २५ हजारांपेक्षा जास्त उत्पादक शेतकरी सह्याद्री फार्म्सला जोडले गेले आहेत. यामुळेच४० पेक्षा जास्त देशांच्या बाजारपेठेत कंपनीची उत्पादने विक्री करता येतात.












