Joint Agresscola : परभणीला जॉईट ॲग्रेस्कोला सुरूवात; शेतकऱ्यांना मिळणार नवीन वाणे..

Joint Agresscola : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्यावतीने आयोजित जॉईंट ॲग्रेस्कोचे म्हणजेच संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या 53 व्या बैठकीचे उद्‌घाटन काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.
 

शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. राज्यातील कृषी विद्यापिठांनी प्रमुख पिकांच्या उत्पन्न वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावी वापराचे मॉडेल तयार करण्याबाबत संशोधन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. वातावरणीय बदल, कीड व्यवस्थापन, तसेच पावसाचा खंड पडल्यानंतरही तग धरू शकणारे वाण शेतकरी बांधवांना उपलब्ध देण्याबाबतचे संशोधन अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वातावरणीय बदलामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने उभा राहिली आहेत. बदलत्या तंत्राचा वापर करत गुंतवणूक आधारित शेती आपल्याला करावी लागणार आहे. संरक्षित शेतीसाठी शेतीमध्ये गुंतवणूक वाढवावी लागेल. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वातावरणीय बदलामुळे निर्माण होणाऱ्या पावसातील खंड सारख्या संकटात तग धरू शकेल, असे वाण विकसित करावे लागणार आहे. पावसाचा खंड, कीड व्यवस्थापन, वातावरणीय बदलात पावसाचा खंड आदी संकटात तग धरू शकणारे वाण विकसित करण्यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला कामे करावे लागेल तसेच शेती क्षेत्रात संशोधन करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठांनी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. हा वापर वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी ‘मिशन कृत्रिम बुद्धिमत्ता’ सुरु करावे. या माध्यमातून प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे नवे मॉडेल विकसित करावे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रगतीत कृषी विद्यापीठाचे योगदान:

शेतकऱ्यांच्या प्रगतीत कृषी विद्यापीठाचे योगदान मोठे आहे. शेतकरी बांधवांना विकसित वाण मिळण्यासाठी कृषी विद्यापिठांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, त्यासाठी तीन दिवस चालणारी संयुक्‍त कृषी संशोधन आणि विकास समिती परिषद महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील शेतकरीही विद्यापीठाच्या बरोबरीने प्रयोग करतो आहे, अशा शेतकरी बांधवांना विद्यापीठांनी सोबत घेवून काम करावे. केंद्र सरकारने एक दिवस बळीराजासोबत हा उप्रकम सुरू केला असून राज्य शासनाने या उप्रकमात सक्रीय सहभाग घेतला आहे, असे कृषी मंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.