Fruit cultivation : नवीन केळी, आंबा, सीताफळबाग लागवडीसाठी महत्त्वाच्या टिप्स..

Fruit cultivation : सध्याचा पाऊस हा पूर्वमोसमी असल्याने शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता असल्याने पीक कापणी पुढे ढकलावी आणि कापलेले पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. विद्यापीठाने केळी, आंबा आणि सीताफळ लागवडीसाठी काय उपाययोजना कराव्यात याचीही शिफारस केली आहे.

केळी लागवड:
केळीच्या नवीन लागवडीसाठी लागवड करण्या अगोदर हेक्टरी 90 ते 100 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे. नविन केळी बाग लागवडीसाठी ग्रँड नाईन, अर्धापूरी, बसराई (देशावर), श्रीमंती, फुले प्राईड इत्यादी जातींचा वापर करावा.

पूर्वी लागवड केलेल्या बागेत आंतर मशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा.

आंबा लागवड:
आंब्याच्या नवीन लागवडीसाठी 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सूपर फॉस्फेट व 50 किलो शेणखत ‍किंवा कंपोस्ट खत टाकावे व पोयटा मातीने सर्व मिश्रणासहीत खड्डा भरून घ्यावा.

नविन आंबा बाग लागवडीसाठी केसर, पायरी, तोतापूरी, निलम, सिंधू, साईसुगंध, वनराज, लंगडा, रत्ना, परभणी भूषण, निरंजन मल्लीका, दशेहरी इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा.

सीताफळ लागवड:
सिताफळाच्या नवीन लागवडीसाठी 45X45X45 सें.मी. या आकाराचे खड्डे घेऊन त्यात एक ते दिड घमेले चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत, अर्धा किलो सुपर फॉस्फेट, फॉलीडॉल पावडर घालून व चांगल्या मातीच्या मिश्रणाने ते भरावे.

नविन सिताफळ बाग लागवडीसाठी बालानगर, टिपी-7, धारुर-6, अर्कासहान इत्यादी जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान सिताफळ झाडांना काठीने आधार द्यावा.