Tur rate : यंदाच्या हंगामात तुरीच्या पिकाने शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगला भाव मिळवून दिल्याने जतसारख्या दुष्काळी भागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या तुरीचा दर प्रतिक्विंटल ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांदरम्यान स्थिर असून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तो ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. जिल्ह्यातील जत ही तुरीची प्रमुख बाजारपेठ मानली जाते आणि वळसंग, मुचंडी, दरिबडची, तिकोंडी, गुगवाड, सिंदूर या भागांत ‘पिंक’ जातीची तूर मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. तसेच कर्नाटकातील अथणी तालुक्यातील कोट्टलगी, कलमडी, चकमरी या सीमाभागांतूनही तुरीची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. जतसह सोलापूर, बार्शी तसेच कर्नाटकातील चडचण आणि लोणी येथेही तुरीला चांगली मागणी असून सर्व बाजारपेठांमध्ये समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकरीवर्ग आनंदात आहे.
कर्नाटक सरकारने तुरीसाठी जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) अधिक दर देत खरेदी केल्यामुळे बाजारात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. सध्या तुरीचा एमएसपी दर प्रतिक्विंटल ८ हजार रुपये असताना कर्नाटक सरकारने त्यावर ५०० रुपयांचा बोनस जाहीर करून शेतकऱ्यांचा माल खरेदी केला आहे. या निर्णयामुळे तुरीच्या दरात वाढ होऊन सीमाभागातील जत बाजारपेठेतही तुरीला ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल असा समाधानकारक भाव मिळत आहे, ज्याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांनाही होत आहे.
कर्नाटक सरकारचा एमएसपीहून अधिक दर
◼️ सध्या तुरीचा एमएसपी दर प्रतिक्विंटल ८,००० रुपये आहे.
◼️ कर्नाटक सरकारने एमएसपीपेक्षा ५०० रुपये अधिक बोनस देत खरेदी केली.
◼️ बोनस खरेदीमुळे बाजारात तुरीच्या दरात वाढ झाली.
◼️ सीमाभागातील जत बाजारपेठेत तुरीला ८,००० ते ८,५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
◼️ वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे
भावामध्ये सातत्याने बदल
◼️ फेब्रुवारीच्या चालू आठवड्यात ‘पिंक’ तुरीला प्रतिक्विंटल ८,००० ते ८,५०० रुपये दर मिळत आहे.
◼️ जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांत तुरीचा दर ७,५०० ते ७,८०० रुपयांदरम्यान होता.
◼️ २१ ते ३० जानेवारी दरम्यान तुरीला ८,५०० ते ९,००० रुपये असा उच्चांक दर मिळाला.
◼️ ‘मारुती’ वाणाच्या तुरीला सध्या ७,५०० ते ७,८०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे.
◼️ जानेवारी महिन्यात ‘मारुती’ वाणाला सुमारे ७,२०० रुपये दर मिळाला होता.
भाव वाढणार की पडणार?
◼️ सध्या तुरीच्या भावात चढ-उतार होत असले तरी गतवर्षीच्या तुलनेत दर समाधानकारक आहेत.
◼️ मागील वर्षी तुरीला प्रतिक्विंटल केवळ ६,००० ते ७,००० रुपये दर मिळत होता.
◼️ चांगल्या दर्जाच्या मालाला सध्याचा दर स्थिर राहील, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत.
◼️ एमएसपीच्या आसपासच तुरीचा भाव टिकून राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












